अपंग युवतीवर मातृत्व लादले
By Admin | Updated: July 1, 2014 23:26 IST2014-07-01T23:26:25+5:302014-07-01T23:26:25+5:30
अपंगत्वाच्या वेदनेचे ओझे घेऊन ती जगत असताना बालपणीच आईने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न करुन गाव सोडले. जाताना तिला आजीकडे सोपविले.

अपंग युवतीवर मातृत्व लादले
प्रियकर फरार : नात्यातीलच युवकाकडून घडला गुन्हा
धाबा : अपंगत्वाच्या वेदनेचे ओझे घेऊन ती जगत असताना बालपणीच आईने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न करुन गाव सोडले. जाताना तिला आजीकडे सोपविले. आजीच्या पंखाखाली ती जगत होती. अशात तिच्यावर तिच्या मेव्हण्याची नजर गेली. दोघांचा तोल सुटला. आज ती आठ महिन्याची गर्भवती आहे. मात्र तिला गर्भावस्थेत सोडून मेव्हणा फरार झाला. हातात पैसे नसल्याने बाळंतपण कसे करावे, या चिंतेत ती आहे.
मेव्हण्याच्या नातलगांनी आता आपल्याला आधार द्यावा, अशी तिची अपेक्षा आहे. तिने तशी मागणीही केली. मात्र त्यांनीही हात वर केले आहेत. अपंगत्वाच्या वेदनेसोबत आता मातृत्वाचे नवे संकट तिच्यापुढे उभे ठाकले आहे.
ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील लाठी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील आहे. निकिता (काल्पनिक नाव) ही मुलगी एक वर्षाची असतानाच तिला अपंगत्व आले. लहानपणीच आई मरण पावली. आईच्या मृत्यूचा वियोग संपत नाही तोच वडिलांनी दुसरे लग्न केले. हे करताना त्याने मुलीला आजीकडे ठेवले. आजीने लहानपणापासून संगोपन केले. लहानाचे मोठे केले. परंतु ती अपंग असल्यामुळे तिच्याकडून कोणतेही काम होत नाही. अशातच तिच्या मेव्हण्याची नजर तिच्यावर गेली. दोघांचा तोल सुटला व कळत-नकळत ती आठ महिन्यांची गर्भवती आहे.
मातृत्वाचे ओझे घेऊन ती गावात आहे. परंतु होणाऱ्या बाळाचे काय असा गंभीर प्रश्न आता तिच्यासमोर उभा ठाकला आहे. या प्रकाराबाबत गावातील नागरिकांनी लाठी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आर. एस. खैरकर यांना सांगितली. त्यांनी मुलीची भेट घेऊन तक्रार करण्याचा सल्ला दिला.
मात्र मुलीने माझा मेवहणा असल्यामुळे मी तक्रार करू शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे पोलीस यंत्रणाही या विषयात हतबल झाली आहे. (वार्ताहर)