बीजभांडवल कर्ज भरण्यास दुर्लक्ष
By Admin | Updated: July 3, 2015 01:27 IST2015-07-03T01:27:19+5:302015-07-03T01:27:19+5:30
सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळावे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

बीजभांडवल कर्ज भरण्यास दुर्लक्ष
उद्योग केंद्राला फटका : कर्जफेडीबाबत कर्जदार उदासीन
चंद्रपूर : सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळावे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. विविध विभागांसोबत उद्योग केंद्रामार्फतही बेरोजगारांना लघु व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. मात्र, घेतलेले कर्ज परत देण्यासाठी बेरोजगारांची टाळाटाळ सुरु आहे. यामुळे उद्योग केंद्राला लाखोंचा चुना लागत आहे.
प्रत्येकांना नोकरी मिळणे कठीण झाले असून नोकरी सोडून सुशिक्षित बेरोजगार छोट्या-मोठ्या उद्योगांच्या मागे लागले आहेत. जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र आहे. या केंद्राच्या माध्यमातून बेरोजगारांना उद्योग उभारणी, कर्ज, मार्गदर्शन करण्याचे काम सुरु आहे. या केंद्राचे पंतप्रधान रोजगार निर्मिती आणि बीजभांडवल, असे रोजगाराचे दोन उपक्रम आहेत. पंतप्रधान रोजगार निर्मितीच्या माध्यमातून बेरोजगारांना बँकेतून व्यवसायासाठी थेट कर्ज मिळते. कर्जाची ही पद्धत क्लिष्ट आहे. छोटे व्यवसाय करता यावे, यासाठी बीजभांडवल योजना आहे. याअंतर्गत एकूण कर्जाच्या १५ टक्के रक्कम जिल्हा उद्योग केंद्र देते.
१९९३-९४ पासून ही योजना सुरु आहे. बीजभांडवल योजनेतून आतापर्यंत १६१ सुशिक्षित बेरोजगारांनी छोट्या उद्योगांसाठी कर्ज घेतले. या कर्जातून अनेकांनी आपले व्यवसाय सुरु केले. व्यवसाय स्थिरावल्यानंतर कर्जाची ही रक्कम सहा टक्क्यांच्या दराने पाच वर्षात जिल्हा उद्योग केंद्राला परत करावी लागते. मात्र, कर्ज परतफेडीचा विसर सुशिक्षित बेरोजगारांना पडत आहे.
बोटावर मोजण्याइतकेच कर्जदार नियमितपणे कर्ज फेडत असल्याची माहिती आहे. कर्जासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या पायऱ्या चढणारे आता त्याच्या परतफेडीसाठी वेगवेगळी कारणे पुढे करीत असून कर्ज थकीत आहे.
या वेगवेगळ्या कारणांमुळे जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षकही त्रस्त झालेत. आता तर त्यांची कर्ज परत मिळण्याची आशाही सोडल्याचे ते सांगतात. (स्थानिक प्रतिनिधी)