सावित्रीबाईचे कर्तृत्व आत्मसात केल्यास आत्मसन्मान मिळेल
By Admin | Updated: December 18, 2015 01:31 IST2015-12-18T01:31:22+5:302015-12-18T01:31:22+5:30
भारताचा समग्र इतिहास कर्तृत्ववान महानायिकांच्या पराक्रमाने उजळून निघाला आहे. याला इतिहास साक्ष आहे.

सावित्रीबाईचे कर्तृत्व आत्मसात केल्यास आत्मसन्मान मिळेल
चंद्रपुरात व्याख्यानमाला : गंगाधर बनबरे यांचे प्रतिपादन
चंद्रपूर : भारताचा समग्र इतिहास कर्तृत्ववान महानायिकांच्या पराक्रमाने उजळून निघाला आहे. याला इतिहास साक्ष आहे. महिलांनी विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. परंतु सामान्य वर्गातील स्त्री अजूनही काही प्रमाणात शोषित आहे. महिलांनी शिक्षीत होऊन आत्मसन्मानाची कास धरावी, सावित्रीबाईचे कर्तृत्व आत्मसात केल्यास महिलांना आत्मसन्मान आणि प्रगतीपासून कुणीही रोखू शकणार नाही. परंतु २१ व्या शतकातही सावित्रीबाई न कळल्यामुळे देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्याचे मत प्रसिद्ध विचारवंत गंगाधर बनबरे यांनी व्यक्त केले.
शिवमहोत्सव समितीद्वारा प्रियदर्शिनी सभागृह येथे आयोजित स्मृतिशेष भाऊराव शिवराम जेऊरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनिताताई धोटे तर उद्घाटक म्हणून गयाबाई येऊरकर उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष मिनाक्षी ढुमणे, महापौर राखी कंचर्लावार, सपना मुनगंटीवार, नगरसेविका अॅड. शिल्पा आंबेकर, अमृता ठाकरे, माधवी बदखल, संध्या दानव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
गंगाधर बनबरे व्याख्यानमालेचे पुष्प गुंफतांना म्हणाले, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी पारंपारिक प्रथा, रुढी झुंगारुन महिलांना शिकता यावे यासाठी विरोधाची तमा न बाळगता पहिली शाळा पुणे येथे काढली आणि स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. स्त्री शिक्षित झाल्याने ती अत्याचाराचा सक्षमपणे सामना करुन लागली. आज ती प्रत्येक क्षेत्रात पाऊल टाकते आहे, ती सक्षम होत आहे. हे सर्व ज्योतिबा आणि सावित्रीच्या क्रांतिकारी विचारामुळेच घडले आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. महिलांबरोबर पुरुषांनेही फुले दाम्पत्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. तेव्हाच कुठे स्त्री पूर्णपणे सुरक्षित होईल, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक भाषणात शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. चेतन खुटेमाटे यांनी या व्याख्यानमालेचे उद्दिष्ट सांगताना म्हणाले, बहुजन महानायिकांना खरा इतिहास लोकांपर्यंत जाण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या जीवनाच्या दिशा स्पष्ट होणार आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन सोनाली पिदूरकर तर आभार सुप्रिया गौरकार यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्यावर आज व्याख्यान
शिवमहोत्सव समितीच्या वतीने १८ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प ‘राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ’ यांच्यावर प्रसिद्ध विचारवंत गंगाधर बनबरे हे मार्गदर्शन करणार आहे. या पुष्पाचे अध्यक्षस्थानी चंद्रपूरच्या उपविभागीय अधिकारी कल्पना निळ ठुबे राहणार असून प्रमुख उपस्थिती मराठा सेवा संघाचे चंद्रपूरचे कार्याध्यक्ष दीपक जेऊरकर, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष (पूर्व) प्रवीण काकडे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष लता होरे, नगरसेविका उषा धांडे, आशा ठाकरे, अॅड. अनिता चामचोर, मृणाल खुटेमाटे, बेबी उईके, रेखा बलकी, वनिता आसुटकर, कल्पना कष्टी, अर्पणा चौधरी, श्रृती घाटे आदी उपस्थित राहणार आहे. प्रास्ताविक विनोद थेरे हे करणार आहे. तरी चंद्रपूर परिसरातील सर्व श्रोत्यांनी व्याख्यानाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. चेतन खुटेमाटे यांनी केले आहे.