परिमल डोहणे चंद्रपूर : दोन्ही डोळे समांतर कक्षात न राहण्याच्या दोषास तिरळेपणा म्हणतात. यामध्ये एक डोळा वरच्या दिशेने, खालच्या दिशेने, आतील किंवा बाहेरच्या दिशेने वळू शकतो. कुणाला जन्मजात तर कुणाला दृष्टीत अडथळा आल्याने ही समस्या उद्भवते. परंतु, यावर वेळीच व योग्य उपचार तिरळेपणा दूर होऊ शकतो, असा सल्ला चंद्रपुरातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. गुंजन इंगळे, कांबळे यांनी दिला आहे.
ग्रामीण भागात पाळण्यातील खेळण्याकडे बघून तिरळेपणा होतो, अशक्तपणामुळे तिरळेपणा होतो, दुसऱ्या तिरळ्या मुलाची नक्कल केल्याने तिरळेपणा होतो, अशा चुकीच्या कल्पना आहेत. गर्भधारणेदरम्यान झालेल्या काही व्यंगामुळे जन्मजात तिरळेपणा होण्याची शक्यता असते. त्यामुळे लहानपणातच जर तिरळेपणावर उपचार केल्यास योग्य वेळेत उपचार होत असतो. परंतु, त्याला विलंब लावल्यास वय वाढत गेल्यास ही समस्या वाढण्याची शक्यता असते. शस्त्रक्रियेने ही समस्या दूर होत असते. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळीच तज्ज्ञांकडून उपचार घेणे गरजेचे आहे.
तिरळेपणाची लक्षणे
- एक किंवा दोन्ही डोळे वेगवेगळ्या दिशेने पाहणे, दोन प्रतिमा दिसणे.
- दृष्टिदोष : दृष्टिदोष असल्यास लहान वयात मुलं टीव्ही, मोबाइल, पुस्तक अगदी जवळून बघतात. मोठ्या मुलांना शाळेत मागील बाकावरून फळ्यावरचे दिसत नाही.
- तीव्र प्रकाशाकडे बघताना तिरळेपणा असणारी मुले तिरळा डोळा हाताने झाकून घेतात. डोळ्यात पांढरी टीक दिसणे.
असा करावा उपचार
- दृष्टिदोषामुळे तिरळेपणा असल्यास योग्य वयात चष्मा लावणे गरजेचे आहे.
- डोळ्याचा व्यायाम : यात जो सामान्य डोळा आहे त्याला पट्टी करावी लागते आणि जो डोळा तिरळा (आळशी) झालेला आहे त्याची नजर वाढवता येते.
- तिरळेपणावर शस्त्रक्रिया : 3 शस्त्रक्रिया ही लवकरात लवकर करणे गरजेचे राहते. प्रथम शस्त्रक्रिया झाल्यानंतर ८० टक्के तिरळेपणा दूर होतो. उर्वरित २० टक्के तिरळेपणा दूर करण्यासाठी कधी कधी २-३ शस्त्रक्रिया कराव्या लागू शकतात
तिरळेपणाची कारणेअनुवंशिकता, मोठ्या नंबरचा चष्मा असणे, असंतुलित स्नायूशक्ती, डोळ्यांचे आजार जसे मोतीबिंदू, बुबुळावरील व्रण, आंतर पटलाचे रोग, डोळ्यामध्ये गाठ असणे.
"तिरळेपणाबाबत अनेक चुकीचे गैरसमज आहेत. परंतु, तिरळेपणावर वेळीच उपचार झाला नाही, तर उपचार करणे कठीण होते. परिणामी कायमची दृष्टी जाऊ शकते. तिरळेपणावर वेळीच उपाय केल्याने दृष्टिहीनता व तिरळेपणावर मात करता येऊ शकते. त्यामुळे लक्षणे दिसताच नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा."- डॉ. गुंजन इंगळे, कांबळे, चंद्रपूर