चंद्रपूर : निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत नियम पायदळी तुडवले, तर त्याची किंमत मोजावी लागणार आहे. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक छापील साहित्यावर मुद्रक प्रकाशकाचे नाव आणि छापील प्रतींची संख्या नमूद करणे कायद्याने बंधनकारक असून, याकडे दुर्लक्ष केल्यास थेट कारवाई होणार असल्याचा इशारा निवडणूक प्रशासनाने दिला आहे. विशेष म्हणजे, या कारवाईचा फटका केवळ उमेदवारांनाच नव्हे, तर संबंधित प्रिंटिंग प्रेस मालकांनाही बसणार आहे.
मुद्रक-प्रकाशकाचे नाव आणि संख्या छापणे बंधनकारक
निवडणुकीच्या प्रत्येक साहित्यावर कोणत्या प्रिंटिंग प्रेसमध्ये छपाई झाली, कोणी ते प्रकाशित केले आणि किती प्रती छापण्यात आल्या, याची स्पष्ट नोंद असणे आवश्यक आहे. प्रचाराच्या नावाखाली गोंधळ, अफवा किंवा बदनामीचा खेळ रोखण्यासाठीच हे नियम लागू करण्यात आले आहेत.
आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार कुठे कराल ?
आचारसंहिता भंगाची तक्रार नागरिकांना थेट निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी किंवा जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे करता येणार असून, 'CVIGIL' अॅपद्वारेही तक्रार नोंदवता येणार आहे.
प्रिटिंग प्रेसवर होऊ शकते ही कारवाई
नाव व संख्या न छापता प्रचार साहित्य छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेस मालकाला तुरुंगवास, आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे 'छापा आणि विसरा' ही भूमिका आता धोकादायक ठरणार आहे.
उमेदवारांवर कारवाईची काय तरतूद ?
नियमांचे उल्लंघन झाल्यास उमेदवारावर आचारसंहिता भंगाची नोंद होऊ शकते. त्याचबरोबर संबंधित खर्च निवडणूक खर्चात थरला जाणार असून, गंभीर प्रकरणांत उमेदवारीवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पत्रकाची प्रत निवडणूक कार्यालयाकडे सादर करणे अनिवार्य
कोणतेही पत्रक, पोस्टर किंवा भित्तीपत्रक लावण्यापूर्वी त्याची एक प्रत संबंधित निवडणूक कार्यालयाकडे सादर करणे उमेदवारासाठी अनिवार्य आहे. ही प्रक्रिया न पाळल्यास तेही आचारसंहिता उल्लंघनात धरले जाणार आहे.
निवडणूक प्रचार साहित्य म्हणजे काय ?
निवडणूक प्रचार साहित्य म्हणजे पत्रके, हस्तपत्रके, पोस्टर, बॅनर, फ्लेक्स, भित्तीपत्रके, घोषणाफलक अशा सर्व प्रकारच्या छापील जाहिरातींचा समावेश होतो.
प्रकाशनात जात, धर्म, चारित्र्यहनन नको
प्रचार साहित्याच्या मजकुराबाबतही निवडणूक आयोगाने कडक पवित्रा घेतला आहे. जात-धर्माच्या आधारावर मतभेद निर्माण करणारा मजकूर, समाजात तेढ पसरवणारी भाषा किंवा विरोधकांचे चारित्र्यहनन करणारे आरोप छापण्यास पूर्णतः मनाई आहे. अशा प्रकारचा मजकूर आढळल्यास तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Web Summary : Election authorities warn of strict action for violating campaign rules. Printing presses must include publisher details and print quantities. Violations can lead to fines, imprisonment, and even candidate disqualification. All printed material must be submitted to election officials.
Web Summary : चुनाव प्रचार में नियमों का उल्लंघन करने पर कड़ी कार्रवाई की जाएगी। प्रिंटिंग प्रेस को प्रकाशक का विवरण और मुद्रित मात्रा शामिल करनी होगी। उल्लंघन पर जुर्माना, कारावास और उम्मीदवारी रद्द हो सकती है। सभी मुद्रित सामग्री चुनाव अधिकारियों को जमा करनी होगी।