रहिवासी पुरावा न दिल्यास अन्नसुरक्षा योजनेचे रेशनकार्ड होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:41 IST2021-02-05T07:41:19+5:302021-02-05T07:41:19+5:30

चंद्रपूर : पात्र नसलेल्या कुटुंबाने शिधापत्रिकेद्वारे स्वस्त दरात अन्नधान्य घेणे आता लाभार्थ्यांना महागात पडणार असून अन्नधान्य पुरवठा विभागाद्वारे अशा ...

If the resident does not provide proof, the ration card of the food security scheme will be canceled | रहिवासी पुरावा न दिल्यास अन्नसुरक्षा योजनेचे रेशनकार्ड होणार रद्द

रहिवासी पुरावा न दिल्यास अन्नसुरक्षा योजनेचे रेशनकार्ड होणार रद्द

चंद्रपूर : पात्र नसलेल्या कुटुंबाने शिधापत्रिकेद्वारे स्वस्त दरात अन्नधान्य घेणे आता लाभार्थ्यांना महागात पडणार असून अन्नधान्य पुरवठा विभागाद्वारे अशा लाभार्थ्यांचा शोध घेतला जाणार आहे. विभागाला दिलेला पुरावा संशयास्पद असल्यास पोलिसांकडूनही तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे बोगस लाभार्थ्यांवर आता चाप बसणार आहे.

अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन त्या रद्द करण्याच्या सूचना पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेण्यात येणार आहे. यामध्ये बीपीएल. अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे. कार्डधारक ज्या भागात राहतात. त्या भागातील निवासाचा पुरावा देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. पुरावा न दिल्यास संबंधितांचे शिधापत्रिका रद्द होणार आहे. विशेष म्हणजे, पुरावा सादर करताना तो एक वर्षापेक्षा जुना नसावा, हेही तपासले जाणार आहे. नागरिकांना सदर पुरावा संबंधित स्वस्त धान्य दुकान, तहसील कार्यालय, तलाठ्यांकडे द्यावा लागणार आहे.

पुरावा संशयास्पद असल्यास पोलीस विभागाकडून तरासणी केली जाणार आहे. एकाच कुटुंबात विभक्त सद्यांना अंत्योदय किंवा बीपीएलचा लाभ मिळणार नाही, याचीही खबरदारी घेतली जाणार आहे.

अंत्योदय

१,३८,०१०

प्राधान्य कुटुंब

२,६३,२६२

केशरी

५५,४३१

हे पुरावे आवश्यक

रेशन कार्डधारक त्याच भागात राहत असल्याचा पुरावा, भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबाबतचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबूक, विजेचे देयक, टेलिफोन, मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड आदी पुरावे द्यावे लागणार आहेत.

बाॅक्स

रेशनकार्ड होणार रद्द

रेशनकार्डची तपासणी करताना ज्या शासकीय, निमशासकीय, खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांचे उत्पन्न एक लाख रुपयांहून जास्त असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिका तत्काळ रद्द करण्याचे आदेश आहेत. त्यांच्या मागणीनुसार शिधापत्रिका मिळू शकेल. याशिवाय एका कुटुंबात किंवा एका पत्त्यांवर दोन शिधापत्रिका मिळणार नाहीत. दुबार, अस्तित्वात नसलेली व स्थलांतरित व्यक्ती तसेच मृत व्यक्तींची नावे वगळण्यात येणार आहेत.

बाक्स

समिती देणार अहवाल

शोधमोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती राहणार आहे. या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा समावेश आहे.या शोधमोहिमेदरम्यान, अपात्र ठरविण्यात आलेल्या शिधापत्रिकांचा अहवाल राज्य शासनाला सादर करावा लागणार आहे.

बाॅक्स

१५ दिवसांची मिळणार मुदत

ज्यांच्या शिधापत्रिका निलंबित करण्यात आल्या आहेत. त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. दरम्यान, ते ज्या परिसरात राहतात त्याचा पुरावा त्यांना १५ दिवसांत द्यावा लागणार आहे. त्यानंतर पुरावा न आल्यास रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया एक महिन्यामध्ये करण्यात येणार आहे.

बाॅक्स

सध्या काय मिळते

शुभ्र व केशरी कार्ड- काहीही मिळत नाही

अंत्योदय-२५ किलो गहू, १० किलो तांदूळ, एक कि.डाळ,

प्राधान्य कुटुंब- ३ किलो गहू, २ किलो तांदूळ, एक किलो. डाळ

--

कोट

शासन निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांना आवश्यक माहिती तसेच रहिवासी पुरावा सादर करावा लागणार आहे. उत्पन्न अधिक असलेल्यांना लाभ मिळणार नसून त्यांच्या शिधापत्रिका बाद होणार आहे.

-भारतकुमार तुंबडे

प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी, चंद्रपूर.

Web Title: If the resident does not provide proof, the ration card of the food security scheme will be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.