रुग्ण दगावल्यास मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST2021-04-25T04:27:38+5:302021-04-25T04:27:38+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करणे कठीण होत आहे. काही ...

रुग्ण दगावल्यास मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करणे कठीण होत आहे. काही रुग्णांना प्राणवायूची गरजे भासते. त्यावेळी प्राणवायू उपलब्ध होत नाही. परिणामी, कोराेनाबाधित रुग्णांना जीव वाचविण्यासाठी व वैद्यकीय उपचार करण्यासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यात धाव घ्यावी लागते. मात्र, तेथील कोविड सेंटरमध्ये जिल्ह्यातील रुग्ण दगावल्यास मृतदेह थेट नातेवाइकांच्या स्वाधीन केला जात आहे.
विशेष म्हणजे, तो मृतदेह घेऊन नातेवाईक गावात आल्यास, संबंधित ग्रामपंचायत मृतदेह घेऊन गावात येण्यास मज्जाव करीत आहेत. त्यामुळे नातेवाइकांची मोठी गैरसोय होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, तालुक्यातील १० ते १५ कोरोनाबाधित रुग्ण तेलंगणा राज्यातील मंचेरीयाल येथे उपचारादरम्यान दगावले. कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवावर त्याच ठिकाणी अंत्यसंकार करणे गरजेचे आहे. मात्र, तेथील वैद्यकीय यंत्रणा कोरोनाबाधिताचा मृतदेह नातेवाइकांना सुपुर्द करत आहे. तो मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यात आणल्यानंतर, त्या गावात अंत्यसंस्काराची वेगळी स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याच प्रमाणे त्या कुटुंबीयांतील नागरिकांनाही कोरोनाची बाधा होत आहे. परिणामी, चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्याप्रमाणे, कोरोनाबाधित मृतदेह नातेवाइकांना सुपुर्द करताना कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केली जात नाही.
बॉक्स
विसापूर ग्रामपंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
या गंभीर प्रकाराबाबत काहीतरी उपाययोजना तत्काळ होणे आवश्यक असल्याने, विसापूर ग्रामपंचायतीने याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून लक्ष वेधले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन कोरोनाबाधित रुग्ण दगावल्यानंतर परस्पर मृतदेह नातेवाइकांना सुपुर्द न करता, तेलंगणा राज्यात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश देऊन उपाययोजना करावी, कोरोनाबाधिताचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यात येऊ नये, याबाबत तेथील प्रशासनाला निर्देश द्यावे किंवा जिल्ह्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी विसापूरच्या सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी केली आहे.