दिग्गज जिंकले तर काही हरले

By Admin | Updated: February 24, 2017 01:18 IST2017-02-24T01:18:46+5:302017-02-24T01:18:46+5:30

जिल्ह्यात अनेक जिल्हा परिषद क्षेत्रात दिग्गज एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले होते.

If the giants win, some lose | दिग्गज जिंकले तर काही हरले

दिग्गज जिंकले तर काही हरले

चंद्रपूर: जिल्ह्यात अनेक जिल्हा परिषद क्षेत्रात दिग्गज एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले होते. यापैकी पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा-घोसरी क्षेत्रात भाजपाचे देवराव भोंगळे तर काँग्रेसकडून विनोद अहीरकर यांच्या लढतीकडे सर्व जिल्हावासीयांचे लक्ष लागून होते. यात देवराव भोंगळे यांनी ७४३५ मते घेत विनोद अहीरकर यांचा पराभव केला. अहीरकर यांना ५९६८ मते मिळाली. तसेच याच तालुक्यातील देवाडा खु.-केमारा जिल्हा परिषद क्षेत्रातून रिंगणात असलेले काँग्रसचे प्रकाश पाटील मारकवार व राहुल संतोषवार यांच्या लढतीकडे लक्ष होते. यात संतोषवार यांनी ५८०७ मते घेत प्रकाश पाटील मारकवार यांचा पराभव केला. मारकवार यांना ३०१५ मते मिळाले.
चिमूर तालुक्यातील शंकरपूर-डोमा जिल्हा परिषद क्षेत्रातील काँग्रेसचे डॉ. सतीश वारजूकर व मनोहर रंधये यांच्या लढतीकडे लक्ष लागले होते. या लढतीत वारजूकर यांनी ८३४४ मते घेत रंधये यांचा पराभव केला. रंधये यांना ६१३५ मते मिळाली. भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा-मुधोली या क्षेत्राकडेही नजरा लागल्या होत्या. या क्षेत्रात चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश पा. चोखारे रिंगणात होते. मात्र त्यांचा पराभव झाला. शिवसेनेचे सुधीर मुडेवार यांचा पराभव करीत भाजपाचे मारोती गायकवाड विजयी झाले. चोखारे हे तिसऱ्या स्थानावर राहिले. वरोरा तालुक्यातील खांबाडा-चिखणी या क्षेत्रात काँग्रेसच्या डॉ. आसावरी देवतळे रिंगणात होत्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती मत्ते यांचा ७४३ मतांनी पराभव केला. सावली तालुक्यातील बोथली-कवठी क्षेत्रातून काँग्रेस पक्षाकडून रिंगणात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदिप गड्डमवार यांची बहीण नंदा अल्लूरवार यांचाही पराभव झाला. या क्षेत्रातून भाजपाच्या मनिषा चिमूरकर यांनी ४५०४ मते घेत विजय मिळविला. तर अल्लूरवार यांना ४४७७ मते मिळाली. याच तालुक्यातील व्याहाड-हरांबा क्षेत्रात काँग्रेसचे दिनेश चिटनूरवार यांच्या लढतीकडे लक्ष होते. मात्र त्यांचा भाजपाचे संतोष तंगडपल्लीवार यांनी ७४९१ मते घेत पराभव केला. चिटनूरवार यांना ५५२१ मते मिळाली. मूल तालुक्यातील राजोली-मारोडा क्षेत्रात विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले रिंगणात होत्या. त्या ९ हजार ७९९ मते घेऊन विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या वैशाली पुल्लावार यांचा पराभव केला. सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर-शिवणी क्षेत्रातून विद्यमान जि. प. उपाध्यक्ष कल्पना बोरकर यांचे पती राजेंद्र बोरकर यांचा काँग्रेसचे रमाकांत लोधे यांनी पराभव केला. राजुरा तालुक्यातील देवाडा-डोंगरगाव जिल्हा परिषद क्षेत्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर मामुलकर यांची भाची मेघा नलगे रिंगणात होत्या. नलगे यांनी भाजपाच्या माधुरी तुराणकर यांचा पराभव केला.

Web Title: If the giants win, some lose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.