श्री राम मंदिरात ३२ देवदेवता व पाच संतांच्या मूर्तीचे होते दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST2021-04-21T04:28:09+5:302021-04-21T04:28:09+5:30

रामनवमीनिमित्त मंदिराची नेत्रदीपक रंगरंगोटी सिंदेवाही : शहरातील जुन्या वस्तीत असलेल्या श्रीराम मंदिरात चक्क ३२ देव देवतांचे व पाच संतांच्या ...

The idols of 32 deities and five saints were seen in the Shri Ram temple | श्री राम मंदिरात ३२ देवदेवता व पाच संतांच्या मूर्तीचे होते दर्शन

श्री राम मंदिरात ३२ देवदेवता व पाच संतांच्या मूर्तीचे होते दर्शन

रामनवमीनिमित्त मंदिराची नेत्रदीपक रंगरंगोटी

सिंदेवाही : शहरातील जुन्या वस्तीत असलेल्या श्रीराम मंदिरात चक्क ३२ देव देवतांचे व पाच संतांच्या मूर्तींचे दर्शन होणार आहे. शहरातील राम मंदिर चौकात हे मंदिर असून, हे मंदिर फार जुने असल्याची ग्वाही येथील गरुड स्तंभ देत आहेत.

या मंदिरात एकाच ठिकाणी ३२ देवतांच्या व पाच संतांचे दर्शन घेता येते. या मंदिराच्या सभोवताल खूप मोकळी जागा असून, मुख्य गाभार्‍यात श्रीराम, लक्ष्मण, सीता या देवतांच्या मूर्ती आहेत. बाजुला राधा-कृष्ण व हनुमानाची मूर्ती आहे. त्यानंतर संतोषी व दुर्गा माता मंदिर आहे. त्यालगत दत्ताची व श्रीकृष्णाची मूर्ती आहे. या मंदिराच्या बाजूला विठ्ठल रूक्मिणीची मूर्ती असून, बाजुच्या मंदिरात तिरुपती बालाजी आपल्या दोन्ही अर्धांगिनींसोबत विराजमान झालेले आहेत. त्यानंतर बाजूला नवग्रहाच्या नवमूर्ती ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर माता सरस्वती, श्री गणेश व नागोबा विराजमान झालेले आहेत. त्यानंतर बाजूला शिवलिंग व नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या कळसावर वैकुंठाला नेण्यासाठी देवदैवत असल्याच्या मूर्ती आहेत.

तसेच याच मंदिर परिसरात संत थुटे महाराज, संत तुकडोजी महाराज, श्री साईबाबा, संत गजानन महाराज व संत जलाराम महाराजांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या बाजूला भव्य रुपामध्ये साक्षात भगवान हनुमान सर्वांच्या रक्षणासाठी विराजमान असल्याचे दिसून येते.

या मंदिरात वर्षांतून दोन वेळा नवरात्रात व चैत्र महिन्यातील गुडीपाडवा ते राम नवमी यावेळी येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी देवीच्या नवरात्रात घटस्थापना केली जाते. येथे नवरात्रात नऊ दिवस म्हणजेच दसऱ्यापर्यंत गर्दी उसळली असते.

हे श्रीराम मंदिर फार जुने असून, त्या मंदिराची देखभाल दोषी परिवार करीत आहेत. या परिवारातील सध्या सुनीलभाई दोषी सध्या देखभाल करतात. मंदिरातील परिसरात भरपूर पटांगण आहे. परिसरात नागरिक भक्तीमय वातावरणात श्री राम नवमीच्या दिवशी राम जन्म कथेचे वाचन आणि आरती, पूजा, प्रसाद वाटप नंतर गावातील प्रमुख मार्गाने संध्याकाळी रामाच्या प्रतिमेची शोभायात्रा श्री आझाद युवा गणेश मंडळाच्या वतीने काढण्यात येते. आता राम नवमीच्या निमित्ताने मंदिराची नेत्रदीपक रंगरंगोटी करण्यात आली आहे.

Web Title: The idols of 32 deities and five saints were seen in the Shri Ram temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.