लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड (चंद्रपूर) : कर्जाच्या परतफेडीसाठी स्वतःची किडनी विकावी लागलेल्या मिंथूर येथील शेतकरी रोशन शिवदास कुळे याला न्याय देण्याबाबत शासनाने दाखवलेली 'सहानुभूती' आजही कागदोपत्री प्रक्रियेतच अडकली आहे. घटना उघडकीस येऊन दीड महिन्याहून अधिक काळ लोटला तरीही रोशन कुळेंना कोणतीही प्रत्यक्ष मदत मिळालेली नसल्याने "न्याय कधी?" असा सवाल नागभीड तालुक्यातून उपस्थित केला जात आहे.
रोशन कुळे यांनी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र सावकारांच्या अवैध व्याजदरामुळे त्यांनी तब्बल ७४ लाख रुपये परत केल्याचा आरोप आहे. तरीही समाधान न झाल्याने सावकारांनी रोशन कुळेंना किडनी विकण्यास बाध्य केले, अशी गंभीर बाब समोर आली. प्रकरण उघडकीस येताच संपूर्ण राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी किशोर रामभाऊ बावनकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे, प्रदीप रामभाऊ बावनकुळे, संजय विठोबा बल्लारपुरे, मनीष पुरुषोत्तम घाटबांधे व सत्यवान रामरतन बोरकर यांना अटक केली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. घटनेनंतर रोशन कुळेंना न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली.
पालकमंत्री, आमदार तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतः रोशन कुळेंच्या घरी भेट देऊन तत्काळ भरपाई दिली जाईल, सावकारांची मालमत्ता जप्त करून ती पीडित शेतकऱ्याला दिली जाईल, अशी ग्वाही दिली होती. मात्र, प्रत्यक्षात आजही रोशन कुळे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
सावकारांच्या खात्यातील रक्कम सील
अवैध सावकारांच्या खात्यातील ११ लाख चार हजार रुपये जप्त करून सील करण्यात आले आहेत. तसेच चार तोळे सोने, दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून, ४५ आर शेतजमिनीबाबत डीडीआरकडे सुनावणी सुरू आहे. डीडीआरच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते. दरम्यान, सर्व प्रक्रिया सुरू असल्या तरी रोशन कुळेंच्या हातात अद्याप एकही रुपया पडलेला नाही, हीच वस्तुस्थिती आहे.
"मी सर्व काही गमावले आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. त्वरित मदतीची गरज आहे. सावकारांच्या मालमत्तेतून भरपाई दिली जाईल, असे सर्वच पातळ्यांवरून सांगण्यात आले होते; पण अद्याप शासनाकडून एक रुपयाही मिळालेला नाही."- रोशन कुळे, पीडित शेतकरी, मिथूर.
Web Summary : Despite selling his kidney to repay debt, farmer Roshan Kule awaits promised compensation. Authorities seized assets from lenders, but Kule remains in dire straits, highlighting the slow pace of justice.
Web Summary : कर्ज़ चुकाने के लिए गुर्दा बेचने के बावजूद, किसान रोशन कुले को वादे के अनुसार मुआवज़े का इंतज़ार है। अधिकारियों ने साहूकारों की संपत्ति जब्त की, लेकिन कुले अभी भी बुरी हालत में हैं, जो न्याय की धीमी गति को उजागर करता है।