प्रकाश काळे लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा भडका उडाला. त्यामुळे नदी, नाले, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. सद्यःस्थितीत राजुरा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो बंधाऱ्यांत पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, नदी पट्टयातील बहुतांश गावांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे.
राजुरा तालुक्यात वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोवरी, सास्ती, पोवनी, गोवरी डीप, धोपटाळा परिसरात मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खाणी ३०० ते ४०० फूट खोल असल्याने दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या उग्र होत चालली आहे. यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच बारमाही वाहणाऱ्या नदी, नाल्यात अत्यल्प जलसाठा होता. एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने अंग शेकून निघत आहे. पुढील मे महिन्यात उन्हाच्या प्रखर झळा नागरिकांना बसणार असून, त्यासोबतच नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही वेकोली परिसरातील नाले, तलाव, बंधारे कोरडे पडल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पाण्याअभावी जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली असून कधी कोरडे न पडणारे नदी, नाले, तलाव कोरडे पडल्याने पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. ३०० ते ४०० फूट खोल वेकोलीच्या खुल्या कोळसा खाणी राजुरा तालुक्यात आहेत. या कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळी खालावत चालली आहे.
कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळी घटलीराजुरा तालुक्यात वेकोलीच्या मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणी ३०० ते ४०० फूट खोल असल्याने दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्याचा फटका वेकोली परिसरातील गावांना बसला आहे. नदी, नाल्याचे पात्र कोरडे पडत चालल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करीत आहे.
वर्धा नदीत अत्यल्प जलसाठाराजुरा तालुक्यातून वाहणाऱ्या आणि नदी पट्टयातील गावांची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने वर्धा नदीचे अर्धे अधिक पात्र कोरडे पडले आहे. त्याचा मोठा फटका परिसरातील गावांना बसणार आहे.