नवीन वस्त्यांत रानडुकरांचा शिरकाव
चंद्रपूर : शहरातील काही नवीन वस्त्यांमध्ये डुकरे मोकाट फिरत असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बाहेर अंगणात छोटी बालके खेळत असल्याने धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
गाव विकासासाठी योगदान द्यावे
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहे. लॉकडाऊनमुळे अनिष्ट परिणाम झाला. मात्र उद्योग परिसरातील गावांचा अद्याप विकास झाला नाही. करवसुली न झाल्याने ग्रामपंचायतींना विकास कामे करताना यंदा अडचणी येणार असून नवीन योजनाही बंद आहेत. त्यामुळे उद्योगांनी गावांना दत्तक घेऊन गावांच्या विकासासाठी योगदान देण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
सावली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्त
सावली : तालुक्यातील आदिवासी गावात सौर दिवे लावण्यात आले. परंतु, अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. रात्री अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सौरदिवे दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
वळण मार्गावर अपघाताची शक्यता
कोरपना: तालुक्यातील हेटी या गावातून वणी-कोरपना मार्ग जातो. मात्र या मार्गावर मोठे वळण असल्याने अनेकदा या ठिकाणी अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी या गावातून जाणाऱ्या रस्त्यावर रस्ता दुभाजक तयार करण्याची मागणी केली जात आहे.
शहरातील पथदिवे अनेकवेळा बंदच
चंद्रपूर : बाबुपेठ परिसरातील अनेक भागात पथदिवे रात्रीच्या सुमारास बंद असतात. त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे नागरिकांना रस्त्यातून मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याकडे महापालिकेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
खासगी शिकवणी वर्गांनाही फटका
चंद्रपूर : लॉकडाऊननंतर सर्वच बंद झाल्याने खासगी शिकवणी वर्गावरही निर्बंध आले. परिणामी शिकवणी वर्ग संचालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिकवणीपासून मुकावे लागत आहे.
झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी
चंद्रपूर : तुकूम परिसरात महेश भवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिव्यांसमोर झाडाच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पोहोचत नाही. तसेच फांद्यामुळे वाहनधारकांनाही त्रास होत आहे.संबंधितांनी पथदिव्यांसमोरील फांद्या तोडाव्या, अशी मागणी केली जात आहे.
पाण्याच्या टाक्या ठरल्या शोभेच्या वास्तू
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना धोका
वरोरा : शहरातील मोकाट कुत्रे तसेच जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. नगर परिषदेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. .
समाज मंदिराकडे लक्ष देण्याची मागणी
कोरपना : तालुक्यातील बहुतांश गावातील समाजमंदिराकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. काही समाजमंदिराच्या खिडक्या चोरीला गेल्या आहे. ज्या उद्देशासाठी शासनाने समाजमंदिरांची उभारणी केली त्या उद्देशाला बगल दिली जात आहे.