This is how a coroned body is cremated | असा होतो कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार

असा होतो कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार

ठळक मुद्देकोरोनाबाधित मृतदेह हाताळणी मार्गदर्शक तत्त्वाचे पालन सक्तीचेइच्छा असल्यास दुरून घेता येते दर्शन

राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सर्व जग कोरोनाविरूद्ध लढत आहे. त्यामुळे मृत्यूचा विचारच मनात उमटू नये, ही सर्वांची भावना आहे. मात्र, कोरोनामुळे मृत्यू झालाच तर प्रशासन या मृतदेहाची हाताळणी करते व मार्गदर्शक तत्त्वे कोणती हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
कोविड १९ महामारीच्या कालावधीत या आजाराने बाधित झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृतदेह कसे हाताळावे, यासंदर्भात केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने १५ मार्च २०२० रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या सुचनांना अनुसरूनच राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १३ मे २०२० रोजी परिपत्रक जाहीर केले. या सुचनांचे पालन करून आरोग्य विभागाला मृतदेहाची हाताळणी केली जाते. कोरोना बाधित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्याकडून मृतदेहातील सर्व नळ्या, इतर वैद्यकीय साधने व उपकरणे सुरक्षितपणे काढावी लागतात. विलगीकरण कक्षातून मृतदेह इतरत्र हलविण्याअगोदर मृत व्यक्तीच्या कुटुंबाने मृतदेह पाहण्याची इच्छा दर्शविल्यास त्यांना योग्य ती खबरदारी घेवून मृतदेहाचे दुरून दर्शन घेण्यास परवानगी आहे. मृतदेहातून कुठल्याही प्रकारची गळती होणार नाही, अशा प्रकारे पट्टी लावली जाते. शरीरावरील धारदार व टोकदार वैद्यकीय उपकरणे ही कडक प्लॅस्टिकच्या डब्यात जमा केली जातात. तोंड व नाकपुड्यांमध्ये कापूस घालून त्यामधून शारीरिक द्रव बाहेर येणार नाही, याची काळजी घेतली जाते.

मृतदेहासाठी लिक प्रुफ बॅग
मृतदेह प्लॅस्टिक पिशवी किंवा रूग्णालयाने पुरवलेल्या बॅगमध्ये ठेवावा लागतो. त्या बॅगचा बाह्यभाग एक टक्के सोडियम हायपोक्लोराइडने निजंर्तुक केल्यानंतर मोरटरी शिटमध्ये किंवा मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी पुरवलेल्या कापडामध्ये गुंडाळावा. मृत व्यक्तीने वापरलेले कपडे व इतर वापरलेल्या वस्तू एका जैविक घातक कचरा पिशवीत टाकावे. तिचा पृष्ठभाग एक टक्के सोडियम हायपोक्लोराइटने निजंर्तूक करावा, अशा सूचना आहेत.

शव बांधण्यास मदत घेवू नये
जर मृत्यूचे कारण हे कोविड १९ असे (सिद्ध झालेले व संशयित) असेल तर मृतदेह विलगीकरण कक्षातून नातेवाईकांना जवळच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी परस्पर हस्तांतरित करावा किंवा काही अडचण असल्यास, नातेवाईक उपलब्ध नसल्यास, वारसदार विलगीकरण कक्षात भरती असल्यास शवगृहात राखून ठेवावा. शव बांधण्याकरिता नातेवाईकांची मदत घेवू नये, असेही मार्गदर्शक तत्त्वात नमुद केले.

चिन्हांकन करण्यास मनाई
मृताच्या नातेवाईकांनी मृतदेहाचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली तर योग्य ती सर्व खबरदारी घेवून विलगीकरण कक्षात दुरून चेहरा पाहण्याची परवानगी द्यावी. मृतदेहावर कोणत्याही प्रकारचे चिन्हांकन करूननये. जर व्यक्ती कोरोनामुळे मृत झाला असेल तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शववाहिनीतून अंत्यविधीच्या ठिकाणी मृतदेह लगेच नेण्याची तयारी केली जाते. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे व नातेवाईकांना तेथे पोहोचण्यासाठी सांगितले जाते. चेहºयाचे दर्शन एक मीटर दुरूनच घेतले जाते.

मृतदेह ताब्यात घेताना
मृतदेहाची ओळख फक्त वारसदार किंवा नेमून दिलेल्या व्यक्तींनी पटवून घ्यावी. संरक्षात्मक साधने वापरावी. सुरक्षित अंतरावरून निरीक्षण करावे. शववाहिनी आल्यानंतर मृतदेह स्वीकारताना कपड्यामध्ये व्यवस्थित गुंडाळून सोडियम हायपोक्लाराइटने एक टक्के निर्जुंतक करून घेतलेल्या प्लास्टिक आवरणातच स्वीकारावा.

धार्मिक विधींना मुभा
अंत्यविधीवेळी धार्मिक मंत्र पठण करणे किंवा दुरून पवित्र पाणी शिंपडणे किंवा इतर धार्मिक विधी दुरून करण्यास मुभा आहे. जंतुसंसर्ग टाळण्यासाठी त्याची विल्हेवाट जैविक कचरा व्यवस्थापन नियमाप्रमाणे करावी. मृतदेहाची राख गोळा केल्याने विषाणू संसर्गाच्या कुठल्याही प्रकारचा धोका नाही, असे मार्गदर्शक तत्त्वात नमुद आहे.

मृत व्यक्तीपासून कुणालाही कोरोनाचा संसर्ग होत नाही. कोरोना बाधित रूग्णाच्या मृतदेहावर सन्मानजनक अंत्यविधी करण्याची जवाबदारी महानगर पालिकेकडे आहे. डॉक्टर, सिस्टर, आरोग्य कर्मचारी हे सर्व आपले कर्तव्य बजावत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
-राजेश मोहिते, आयुक्त मनपा, चंद्रपूर

Web Title: This is how a coroned body is cremated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.