घरकुलासाठी घर पाडले, उघड्यावर राहण्याची पाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:18 IST2018-06-03T23:17:48+5:302018-06-03T23:18:10+5:30
गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर येथील एका वृद्ध महिलेला घरकूल मंजूर झाले. या घरकुलाला अजूनपर्यंत ना प्रशासकीय ना, तांत्रिक मंजुरी मिळाली. परंतु, ग्रामसेवकाच्या सूचना मिळाल्या आणि आपले निवासी घर पाडून टाकल्याचा प्रकार आक्सापूर गावात घडला.

घरकुलासाठी घर पाडले, उघड्यावर राहण्याची पाळी
लोकमत न्यूज नेटवर्क
आक्सापूर : गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर येथील एका वृद्ध महिलेला घरकूल मंजूर झाले. या घरकुलाला अजूनपर्यंत ना प्रशासकीय ना, तांत्रिक मंजुरी मिळाली. परंतु, ग्रामसेवकाच्या सूचना मिळाल्या आणि आपले निवासी घर पाडून टाकल्याचा प्रकार आक्सापूर गावात घडला. महिनाभरापूर्वी बेघर झालेल्या या वृद्ध महिलेने ग्रामसेवकाने सांगितल्यानुसार घर बांधकामाला सुरुवातही केली. खड्डे खोदले, विटा देखील खरेदी केल्या. मात्र घरकुलाचा शासकीय निधी तिला आजपर्यंत मिळाला नसल्यामुळे पुढील काम करणे अडचणीचे झाले आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार २०१७-१८ या चालू वर्षात आक्सापूर येथील लहानूबाई बाबाजी धोंडरे (६५) हिला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले. दारिद्र्य रेषेखालील हलाकीचे जीवन जगणाऱ्या या म्हातारीला स्वत:च्या मालकीचे घर होते. तुटक्या-फुटक्या झोपडीत ती कशीबशी जीवन जगत होती. यातच तिला घरकूल मंजूर झाल्याने तिच्या निवासाची समस्या मिटणार म्हणून आनंदाला पारावार उरला नाही. महिन्याभरापूर्वी आक्सापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप घडले यांनी स्वत: लहाणूबाईच्या घराला भेट देवून तिला येत्या दोन दिवसात तुमचे घर उखळून खड्डे खोदकामाला सुरुवात करण्याच्या सूचना केल्या. याचवेळी लहाणूबाईने ग्रामसेवकाला घरचे लग्न आहे, एवढ्यात काम केल्यास आमचा रोजगार बुडेल, असे प्रति उत्तरादाखल सांगितले. परंतु, लाभार्थ्याचे काही एक ऐकून न घेता ग्रामसेवक दिलीप घडले यांनी रोजगार बुडले, लग्न सोडा, मात्र घर बांधा, अशी लहाणूबाईला ताकीद दिली. हे महाशय एवढ्यावरच न थांबता येत्या दोन दिवसात घरकुलाच्या कामाला सुरुवात न केल्यास तुमचे घरकूल रद्द होईल असे देखील सांगितले.
त्यामुळे येथील लहाणूबाई धोडरे यांनी ग्रामसेवकाने सांगितल्यानुसार बांधकामाला सुरुवात केली. त्यांनी आपले निवासी घरकूल पाडून टाकले. विटा खरेदी केल्या, सोबत इतर साहित्याची जुळवाजुळव देखील केली. मात्र लहाणूबाईच्या या घरकूल संदर्भात ग्रामसेवकाची पोल खोलणारा प्रकार महिनाभरानंतर समोर आला. या प्रकरणातील वास्तविक चित्र वेगळे आहे. लहाणूबाई धोडरे यांचे घरकूल तुर्तास मंजूर आहे. अजूनपर्यंत तिच्या घरकुलाला प्रशासकीय मंजूरी मिळाली नाही. तांत्रिक मंजुरीसुद्धा मिळाली नसतानाही दोन दिवसातच तुम्ही घरकुलाच्या कामाला सुरुवात करा, असा हेका आक्सापूरचे ग्रामसेवक दिलीप घडले यांनी वृद्ध महिलेपुढे रेटून धरला होता.
आक्सापुरातील ही गरीब व वृद्ध महिला महिनाभरापासून उघड्यावर संसार करीत आहे. तिच्यावरचे छतच जमिनदोस्त झाल्याने तिने आता आभाळालाच आपल्या कवेत घेतले आहे. या परिस्थितीत मान्सूनची चाहूल लागली आहे. वातावरणात देखील तिव्र बदल दिसू लागला असून या म्हातारीने आता काय करावे, हा प्रश्नच आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन घरकूल द्यावे किंवा ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
घरकूल मंजूर आहे, परंतु घरकुलाला प्रशासकीय व तांत्रिक मंजूरी नाही. याही परिस्थितीत बांधकामाच्या कुणी सुचना दिल्या असल्यास या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करणार
- दीपक सातपुते, पं. स. सभापती
गोंडपिपरी
वरिष्ठांच्या सुचनेनुसार आपण कार्यवाही केली. वरिष्ठांचा निरोप आपण लाभार्थ्यापर्यंत पोहचविला व सुचनांचे पालन केले.
- दिलीप घडले
ग्रामसेवक, आक्सापूर