कोविड केअर सेंटरसाठी वसतिगृह, शाळा ताब्यात घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:50 IST2021-03-26T05:00:00+5:302021-03-25T23:50:02+5:30
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात लागणाऱ्या कोविड केअर सेंटर (सीसीसी) साठी वसतिगृह, शाळा व इतर जागा ताब्यात घेण्यासोबतच आवश्यक उपाययोजनांचे तातडीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी गुरूवारी कोरोना टास्क समितीच्या बैठकीत दिल्या.

कोविड केअर सेंटरसाठी वसतिगृह, शाळा ताब्यात घेणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात लागणाऱ्या कोविड केअर सेंटर (सीसीसी) साठी वसतिगृह, शाळा व इतर जागा ताब्यात घेण्यासोबतच आवश्यक उपाययोजनांचे तातडीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी गुरूवारी कोरोना टास्क समितीच्या बैठकीत दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहण घुगे, चंद्रपूर मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्र सुरपाम, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, जिल्हा लसीकरण अधिकारी संदिप गेडाम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, कोविड १९ प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लसीकरण सुरू आहे. निकषात बसणाऱ्या जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. याशिवाय ऑक्सिजनसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत कन्नाके, चंद्रपूर मनपाचे वैद्यकीय अधिकारी आविष्कार खंडारे, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. प्रतिक बोरकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
पुरेसा औषधसाठा व मनुष्यबळ
चंद्रपूर महानगर क्षेत्रासोबतच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. नागरिकांनी दक्षता बाळगली नाही कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो. अशावेळी पुरेसा औषधसाठा व मनुष्यबळाची कमरता भासू नये, यादृष्टीनेही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला.
अतिरिक्त प्रयोगशाळेची तयारी
कोरोना तपासणीसाठी अडचणी येऊ नये, यासाठी प्रसंगी अतिरिक्त प्रयोगशाळा उभारणे, कोरोना हॉटस्पॉट जाहीर करणे व ३५० खाटांचे महिला रूग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत समितीच्या बैठकीत चर्चा झाली.