रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन व औषधांचा मुबलक पुरवठा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:11+5:302021-04-25T04:28:11+5:30
राजुरा : शासकीय रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन व औषधांचा मुबलक पुरवठा करावा, अशी मागणी आ. सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ...

रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन व औषधांचा मुबलक पुरवठा करावा
राजुरा : शासकीय रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन व औषधांचा मुबलक पुरवठा करावा, अशी मागणी आ. सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना (कोविड-१९) विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दररोज २० ते ३० नागरिकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असताना, जिल्हा प्रशासनाकडून मात्र खासगी रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जात असल्याचे निदर्शनास येते. शासकीय रुग्णालयातील रुग्णांवर योग्य वेळी योग्य उपचार होत नसल्याने व वेळीच शासकीय रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना रेमडेसिविर मिळत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांस रेमडेसिविर मिळणे गरजेचे असताना खासगी रुग्णालयास अधिक पुरवठा होत असल्याने श्रीमंत लोकांनाच रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहे. यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन फक्त श्रीमंतांसाठीच आहे काय, असा सवाल काही नागरिक करीत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेविषयी ग्रामीण भागातील जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन रेमडेसिविर इंजेक्शन वाटपाबाबत कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना करून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना प्राधान्याने रेमडेसिविर इंजेक्शन व औषधांचा पुरेसा पुरवठा करण्यात यावा. जेणेकरून गोरगरीब जनतेला याचा लाभ होईल व अनेकांचे जीव वाचतील, अशी मागणी आमदार धोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री डॉ. सिंगणे आणि जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदनाद्वारे केली आहे.