गृहकर वसुलीत पंचायत समितीची घोडदौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST2020-12-22T04:27:55+5:302020-12-22T04:27:55+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२० पासून शासनाने लाॅकडाऊन घोषित केला. या लाॅकडाऊनने सर्वच व्यवस्था प्रभावित झाल्या. यातून ग्रामपंचायतींची ...

गृहकर वसुलीत पंचायत समितीची घोडदौड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२० पासून शासनाने लाॅकडाऊन घोषित केला. या लाॅकडाऊनने सर्वच व्यवस्था प्रभावित झाल्या. यातून ग्रामपंचायतींची करवसुलीही सुटली नव्हती. मात्र ग्रामंचायतींनी यातून हळूहळू सावरून घेत करवसूलीकडे लक्ष घातले. आता तालुक्यातील ग्रामपंचायतींनी करवसुलीत चांगलीच गती घेतल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसून येत आहे.
नागभीड तालुक्यात ५६ ग्रामपंचायती असून २४ हजार ३८६ करधारक आहेत. या संपूर्ण ग्रामपंचायतींचा अंतर्गत कारभार गृहकर, दिवाबत्तीकर व आरोग्यकर, पाणीकर यांच्यावरच चालत असतो. याशिवाय या ग्रामपंचायतींचे अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. ग्रामपंचायतींचे आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू होत असले तरी कराच्या वसुलीस सामान्यपणे आक्टोबर या महिन्यापासून वेग येते आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत या करवसुलीची टक्केवारी ३५ ते ४० टक्के असते. उर्वरित ६५ ते ६० करवसुली ही मार्चमध्येच होत असते, असा अनुभव आहे. मधल्या काळात ज्यांना एखाद्या शासकीय कामासाठी गृहकर पावतीची गरज पडते असेच व्यक्ती गृहकर अदा करीत असतात. मात्र यावर्षी डिसेंबर महिन्यातच पंचायत समितीने गृहकर ४४.७० तर पाणी कर ४३.४५ टक्के वसूल केला आहे.
नागभीड पंचायत समितीतंर्गत गृहकराची मागणी २ कोटी २४ लाख ५ हजार रूपये आहे. आतापर्यंत यातील १ कोटी ३७ हजार वसुली करण्यात आली आहे. तर पाणीकराची मागणी ६२ लाख ५८ हजार असून २७ लाख १९ हजार रूपये पाणीकर वसूल करण्यात आला आहे.
बॉक्स
ग्रामपंचायतींचे हे मोठे खर्च
माहितीनीसार मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये चार ते पाच कर्मचारी असून लहान ग्रामपंचायतींमध्ये किमान दोन कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे, बहुतेक गावात १० पासून २० पर्यंत विंधन विहिरी आहेत. एका विंधन विहिरीचा एका वर्षाचा देखभाल दुरूस्ती खर्च २ हजार ५०० रूपये आहे, शिवाय ब्लिचिंग करणे, वर्षभर गावातील दिवाबत्तीची सोय करणे आणि पावसाळ्यापूर्वी गावातील नाल्यांची सफाई करणे हे ग्रामपंचायतींचे आवश्यक व मोठी कामे आहेत. कर वसुलीतूनच ग्रामपंचायतींना ही कामे करावी लागतात.
कोट
ग्रामपंचायतीची विविध कामे करामधूनच केली जातात. गाव विकासासाठी नागरिकांनी कर जमा करून ग्रामपंचायतींना सहकार्य करावे.
- प्रणाली खोचरे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती नागभीड.