गावकरी वन्यप्राण्यांच्या दहशतीत

By Admin | Updated: April 29, 2015 01:10 IST2015-04-29T01:10:28+5:302015-04-29T01:10:28+5:30

सिंदेवाही तालुक्यातील अतिदुर्गम कारव्हा हे गाव ताडोबा(कोर) आणि बफर झोनच्या विळख्यात अडकले असून वनविभागाच्या जाचक नियमांमध्ये ...

In the horizons of the village wildlife | गावकरी वन्यप्राण्यांच्या दहशतीत

गावकरी वन्यप्राण्यांच्या दहशतीत

दिलीप मेश्राम/सुनील घाटे नवरगाव-वासेरा
सिंदेवाही तालुक्यातील अतिदुर्गम कारव्हा हे गाव ताडोबा(कोर) आणि बफर झोनच्या विळख्यात अडकले असून वनविभागाच्या जाचक नियमांमध्ये जीवन जगताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच दिवसरात्रं या गावातील नागरिकांना वन्यप्राण्यांच्या दहशतीत जगावे लागत आहे.
घराबाहेर पडले की येथील नागरिकांचा थेट संपर्क येतो तो जंगलाशी. घरा शेजारूनच मोठे जंगल आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर अशा अनेक हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. रात्रीच्यावेळी प्राणी गावात येतात. एवढेच नव्हे तर दिवसाही घराशेजारी या प्राण्यांचे दर्शन होते. काही दिवसांपूर्वी दागो तिमा मानकर, वामन टेकाम, रमेश आदे, भाऊराव गोहणे, राजू गायकवाड, मनोहर शेंडे यांच्यासह गावातील इतर काही जणांच्या जनावरांना वाघाने गावात येऊन ठार मारले. अस्वलसुद्धा गावात येत असल्याने रात्रीला गावात दहशतच असते. रात्रीच्यावेळी शौचाला जायचे झाल्यास जंगलातच जावे लागते. वन्यप्राण्यांच्या दहशतीपोटी काही नागरिकांनी घरामध्ये शौचालये बांधली आहेत.
तलावाजवळ ताडोबाचे गेट असून जवळच्या गावातील एखाद्या व्यक्तीला ताडोबामधून कारव्हा येथे ेयायचे असल्यास अधिकारी त्यांना येऊ देत नाहीत. गावकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी शिवणी रस्त्यावर पुन्हा एक गेट तयार करण्यात आले होते. या गेटवरून सर्व चौकशी करूनच नागरिकांना सोडले जात होते. बाहेर गावावरून परत येण्यासाठी उशिर झाला तर कारव्हा गावातीलच नागरिकांना गावात येण्यासाठी वनविभागाकडून बंदी करण्यात आली होती. मात्र गावकऱ्यांनी एकजुटीने ेशिवणी मार्गावरील गेट बंद करण्यासाठी आंदोलन केले. तोडफोड केली. तेव्हा गावकऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गावकऱ्यांची जनावरे जंगली प्राण्यांकडून मारली तर नुकसान भरपाईसाठी अर्ज करावा लागतो. परंतु क्षेत्रसहायक १२ किलोमिटर अंतरावरील पळसगावला राहतात. संपूर्ण जंगलाचा व वाहतुकीची साधने नसलेला रस्ता असल्याने अनेकजण नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्याचे टाळतात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ-बिबटांची संख्या भरपूर असल्याने गावकऱ्यांना सतत जीवन जगावे लागत आहे. एक वाघीण तीन पिलांसह या परिसरात सतत वावरत असल्याने आणखीन दहशत निर्माण झालेली आहे.
गावकऱ्यांचा नेहमीच जंगलाशी संबंध येतो. वनविभागाची काही कामे रोजगार हमीच्या माध्यमातून चालतात यावरही काही मजूर काम करायला जातात. परंतु त्यांना मजुरीचे पैसे बरोबर मिळत नाही. जंगलात राहत असल्याने, वनविभागाशीच संपर्क येतो. त्यामुळे वन अधिकाऱ्यांच्या दबंगगिरीविरुद्ध ब्र सुद्धा काढायला जमत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

Web Title: In the horizons of the village wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.