आशा ठरल्या देवदूत
By Admin | Updated: September 13, 2014 01:12 IST2014-09-13T01:12:07+5:302014-09-13T01:12:07+5:30
ग्रामीण भागात गावागावामध्ये घराघरातून होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण कमी झाल्यामुळे अर्भक मृत्यूवर नियंत्रण

आशा ठरल्या देवदूत
राजकुमार चुनारकर खडसंगी
ग्रामीण भागात गावागावामध्ये घराघरातून होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण कमी झाल्यामुळे अर्भक मृत्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य होत असल्याचा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. मागील काही वर्षात चिमूर तालुक्यातील आरोग्य संस्थात प्रसुतीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रसुतीमध्ये अर्भक मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. यासाठी आशा वर्कर घरोघरी जाऊन गरोदर माताची नोंद व आरोग्य केंद्रातच प्रसुती करण्यासाठी गरोदर माताला प्रवृत्त करीत आहे. त्यामुळे या नवजात बालकासाठी आशा वर्कर देवदूत ठरत आहेत.
पूर्वी रुग्णालयात येण्याऐवजी ग्रामीण गरोदर महिलांची घरीच प्रसुती करण्याकडे कल होता. त्यामुळे जन्माला येणाऱ्या कित्येक बालकांना गावामधील अपुऱ्या सोयी सुविधाअभावी उपचार मिळत नव्हते. परिणामी अर्भक, बालमृत्यूमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मागील काही वर्षांपासून आशा वर्करच्या माध्यमातून आरोग्य जनजागृतीची मोहिम शासनाने हाती घेतली आहे. आदिवासी ग्रामीण कुटुंबातील गरोदर महिलांची माहिती घेऊन नोंदी करण्याची जबाबदारी या आशा वर्करवर सोपविण्यात आली आहे. आदिवासी ग्रामीण कुटूंबाचे मतपरिवर्तन करून प्राथमिक आरोग्य केंद्रातच प्रसुती करण्याचे प्रयत्न या स्वयंसेविका करतात. त्यामुळे बालमृत्यूच्या प्रमाणात घट होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या आशा वर्कर नवजात बालकासाठी देवदूत ठरत आहेत. या आशा वर्करांना शासनातर्फे मानधन देण्यात येत असल्याने हिरहिरीने काम करीत असल्याचे चित्र गावखेड्यात पहावयास मिळत आहे. याचा लाभ ग्रामीण भागातील अशिक्षीत कुटुंबातील प्रसुती प्राथमिक आरोग्य केंद्रातच होण्यास मदत झाली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकाचे शारीरिक तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या किट वापरण्यात येतात. त्यामुळे बालकांना आरोग्य सुविधा मिळतात व बालमृत्यूचे प्रमाण कमी होते. चिमूर तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्राव्यतिरिक्त ३७ उपकेंद्राची स्थापना केली आहे. या सर्व केंद्रातून प्रसुतीची व्यवस्था केली आहे. पूर्वी दुर्गम भागातील आरोग्य केंद्रात प्रसुतीची व्यवस्था नसल्याने घरीच प्रसुती करण्यात येत होती.