विंजासन येथील ऐतिहासिक बुद्धलेणी

By Admin | Updated: May 4, 2015 01:22 IST2015-05-04T01:22:37+5:302015-05-04T01:22:37+5:30

बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रावती तालुक्यातील विंजासन येथील बौद्ध लेणी टेकडीचा परिसर १० एकरवर व्यापला आहे.

Historical Buddhist monuments in Winnipeg | विंजासन येथील ऐतिहासिक बुद्धलेणी

विंजासन येथील ऐतिहासिक बुद्धलेणी

सचिन सरपटवार  भद्रावती
बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रावती तालुक्यातील विंजासन येथील बौद्ध लेणी टेकडीचा परिसर १० एकरवर व्यापला आहे. त्यात पाच एकर जमिनीवर टेकडी वसलेली आहे. २५०० हजार वर्षांपूर्वीची ही लेणी असून भिक्खू सागत नावाच्या स्थवीराच्या निमंत्रणावरून भगवान गौतम बुद्ध या ठिकाणी येऊन गेले व इथूनच ते अंबतिथ्यकला येथे गेल्याचे इतिहासकार सांगतात. ही बुद्ध गुंफा दोन भागात खोदण्यात आली असून पहिल्या भागात सभागार व शून्यागार कोरण्यात आले आहे. नंतर राजा हर्षवर्धनाच्या काळात बुद्ध मूर्ती कोरण्यात आली. भद्रावतीच्या दक्षिण-पश्चिम दिशेला विंजासनच्या टेकडीत बुद्धगुहा आहे. या टेकडीत ७१ फूट अंतरावर लांब सज्जा काढलेला आहे. येथे एकूण तीन गुंफा असून पहिल्या गुंफेची लांबी ७४ फूट व रूंदी २० फूट आहे. यामध्ये गौतम बुद्धांची ध्यानमुद्रेत कोरलेली मूर्ती ११ फूट तीन इंचाची असून रंग तांबूस आहे. दुसरी गुंफा ४७ फूट लांब असून २० फूट रुंद आहे. यामध्ये सात फूट एक इंच आकाराची असलेली बुद्धांची मूर्ती आहे, तर तिसरी गुंफा ३५ फूट लांब असून मूर्ती ८ फूट चार इंच इतकी आहे. विंजासन या नावाचा अपभ्रंश करण्यात येऊन या गुहेला विजासन म्हटले जाते. पूर्वी या गुहा विद्येचे आसन होत्या. या बौद्ध भिक्खूंना विद्या दिली जाते.
बौद्ध पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
संतराम बी.ए. यांचे शशीम प्रश्न व भद्रावतीची प्राचीन बौद्ध संस्कृती यातील साम्य हा आकर्षणाचा विषय होता. ‘शशीम प्रश्न’ या पुस्तकातील वर्णनानुसार बौद्ध साम्राज्ये व बौद्ध संस्कृतीचा विध्वंस सुरू झाला तेव्हा विदर्भातील एक बौद्ध भिक्खू सुमेध या संकटाची बातमी बौद्ध राजांना देण्यासाठी निघाले. ते भद्रावती राज्याच्या सीमेपर्यंत आले. तेव्हा अंधार पडला होता. ते फार थकलेले होते. त्यामुळे त्यांनी सीमेवरील पहाडावरच विश्रांती घेतली.
दुसऱ्या दिवशी त्यांनी तेथील नागवंशीय बौध्द राजा भद्रशील यांची भेट घेवून सर्व वृत्तांत सांगितला. राजाचा महाल एका परकोटात असून आत दगडांनी बांधलेली पायऱ्यांची विहीर आहे. या विहिरीतून पश्चिमेस एक भुयारी मार्ग आहे. तेथे एका पहाडातील प्रशस्त दालनात तथागत बुध्दांची सुवर्णाची प्रतिमा असून सुवर्ण पत्रात धम्म ग्रंथ ठेवले आहेत. सकाळी याच मार्गाने परतल्यानंतर राजाने या बौद्ध संस्कृतीचा कुणी विध्वंस करू नये व पुढे बौद्ध जनांनी त्याचे संशोधन करून जतन करावे, या हेतूने ते भुयारी द्वार विटांचे बांधकाम करून बंद करून घेतले. आजही या विहिरीच्या आतील पश्चिमेकडील एकच भिंत विटांनी बांधून असलेली आढळून येते. भन्ते सुरेई ससाई यांना घेऊन विंजासन लेणीची पाहणी केली. तेव्हा या लेणीत पूर्व-उत्तर व दक्षिण मुखी तीन द्वार असून आत तीन मोठी दालने व पहाडात कोरलेल्या तथागत बुद्धांच्या तीन भव्य प्रतिमा असल्याचे आढळून आले.
त्यावेळी लेणी परिसर व इतरही ठिकाणी बौद्ध संस्कृतीचे भग्नावशेष आढळून येत असत. परंतु आता अनेक स्थळे ओस पडली आहेत. अनेक स्थळांचे मूळ रूप नष्ट करण्यात आले आहे. या सर्व स्थळांचे निरपेक्ष भावनेने संशोधन, उत्खनन व जतन होण्याची आवश्यकता असल्याचे समाजबांधवांचे म्हणणे आहे. संशोधन झाल्यास अनेक ऐतिहासिक बाबींचा अभ्यास करणे सोईचे होणार आहे.

Web Title: Historical Buddhist monuments in Winnipeg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.