कोरोना हाय, आई मला शाळेत जायचं नाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:41 IST2021-02-05T07:41:03+5:302021-02-05T07:41:03+5:30

चंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागताच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात ...

Hi Corona, Mom I don't want to go to school | कोरोना हाय, आई मला शाळेत जायचं नाय

कोरोना हाय, आई मला शाळेत जायचं नाय

चंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागताच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. कोरोनाचे रुग्ण कमी आढळू लागल्याने आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात रुग्ण आढळत आहेत. प्रतिबंधात्मक लस आली असली तरी हेल्थ केअर कर्मचाऱ्यांनाच प्रथम प्राधान्य देणे सुरू आहे. त्यामुळे अजुनही विद्यार्थ्यांची मानसिकता शाळेत जाण्याची नाही, असे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे.

बुधवारपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची तयारी शाळा व्यवस्थापनाकडून पूर्ण केली जात आहे. खबरदारी म्हणून सकाळी ११ ते दुपारी २ वाजता या वेळातच शाळा भरेल. त्यानंतर मुलांना सुट्टी देण्यात येईल. जिल्ह्यात एकूण १ लाख २५ हजार ६६२ विद्यार्थी शिक्षण घेतात. अध्यापनासाठी १४ हजार १५८ शिक्षक कार्यरत आहेत. शालेय शिक्षण विभागाचा आदेश धडकताच मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीची बैठका घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, पालक व विद्यार्थ्यांची मानसिकता अजूनही सकारात्मक झाली नाही. नववी ते बारावीतील विद्यार्थी आरोग्य व सामाजिक प्रश्नांबाबत जागरूक असू शकतात. पण, पाचवी ते आठवीच्या वयोगटात अशी जागरूकता असेल याची शाश्वती नाही. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याची खबरदारी मुले कशी घेतील, मुख्याध्यापक व शिक्षक मुलांच्या आरोग्याकडे गंभीरतेने पाहतील का, यासारखे अनेक प्रश्न पालक विचारत आहे. मंगळवारपासून शाळा सुरू झाली तरी पाचवी ते आठवीचे विद्यार्थी कसा प्रतिसाद देतील, आठवडाभरात पुढे येऊ शकेल.

शाळा समितीच्या सहकार्याविना अशक्य

सर्व वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या. त्यामुळे मुख्याध्यापकांकडून अंमलबजावणी केली जात आहे. शाळेची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ वाजता असल्याने इंग्रजी, गणित व विज्ञान विषयाच्या अध्यापनाचे नियोजन करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांनी शिक्षकांना दिल्या.

विद्यार्थी काय देत आहेत कारणे ?

कोरोनाची लागण होऊ शकते, शाळेत सॅनिटायझर मिळेल काय, वर्गखोल्यांमध्ये कोरोना रुग्ण राहत होते, शाळेने स्वच्छता केली काय, तब्येत बिघडल्यास शिक्षक घरी जाऊ देणार काय, शाळेत बसण्यासाठी किती अंतर राहणार, पोषण आहार शाळेत दिले तर कसे होणार, शाळा संपायला आता तीन-चार महिने आहेत, आता शाळेत जाऊन काय होणार, शाळेपेक्षा थेट परीक्षा का घेतली जात नाही, यासारखे अनेक प्रश्न विद्यार्थी विचार आहेत. त्यामुळे शाळेबाबत नकारात्मक मानसिकता घर करून आहे.

कोट

मंगळवारपासून शाळा सुरू असल्याची माहिती शिक्षकांनी बाबांना दिली. मात्र, कोरोनामुळे माझ्या मनात भीती आहे. प्रकृती बिघडली तर कसे होणार, शाळेची स्वच्छता केली जाणार काय, असे प्रश्न माझ्या मनात आहेत. आई-बाबा व शिक्षकांनी धीर दिला तरच शाळेत जाण्यासाठी मन तयार होईल.

-शैलेंद्र मांडवे, आठवीचा विद्यार्थी

कोट

कोरोनाची लस जिल्ह्यात आल्याची माहिती अंगणवाडी ताईंनी दिली. मात्र, मुलांना ही लस कधी देणार, याबाबत काही माहिती नाही. शाळा बंद असल्याने माझे नुकसान होत आहे. शाळेला जाण्यासाठी तयार आहे. पण, आमच्या प्रकृतीची काळजी शाळेने घ्यावी.

-श्रीनू भैसारे, सहावी विद्यार्थी

कोट

कोरोना अजूनही गेला नाही. शाळेचा अभ्यास मागे पडला आहे. आमच्या गावातही एकाला कोराना झाला. त्यामुळे या आजाराची भीती आहे. आई-बाबांनी परवानगी दिली तर शाळेत जाईन. माझे मित्रही असेच म्हणत आहेत.

-प्रीतेश जुगनाके, सातवी विद्यार्थी

कोट

कोरोनाची मला भीती वाटते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेत आहे. बुधवारपासून शाळा सुरू आहे. आई-बाबांनी सहमती दिली तर शाळेत जाईन. माझ्या मैत्रिणीही माझ्यासारखाच विचार करीत आहेत.

-प्रणाली सावेकर, पाचवी विद्यार्थिनी

Web Title: Hi Corona, Mom I don't want to go to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.