‘तिच्या’ लग्नासाठी एकवटले गाव
By Admin | Updated: January 13, 2016 01:05 IST2016-01-13T01:02:09+5:302016-01-13T01:05:15+5:30
मुलगी जन्माला आली की, आईवडिलांच्या कपाळावर आठ्या पडतात. तिच्या लग्नासाठी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात.

‘तिच्या’ लग्नासाठी एकवटले गाव
\लोकवर्गणीतून पार पडला विवाह : विसापूरच्या पंचक्रोशीत आगळी-वेगळी घटना
अनेकश्वर मेश्राम बल्लारपूर
मुलगी जन्माला आली की, आईवडिलांच्या कपाळावर आठ्या पडतात. तिच्या लग्नासाठी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. अठराविश्वे दारिद्र्यातील कुटुंबाला अधिकच अडचणीला सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी चिंता सतावत असते. मात्र चिंतामग्न असलेल्या एका गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी सारे गाव एकवटले. लोकवर्गणीतून ‘तिचा’ विवाह सोमवारी थाटात पार पडला. त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. विसापूरच्या पंचक्रोशीत आगळ्या-वेगळ्या विवाहाचा प्रसंग प्रेरणा देणारा ठरला आहे.
बल्लारपूर तालुक्यात विसापूर येथील मधुकर शिवरकर यांची मुलगी अनिता हिच्या लग्नाची ही गोष्ट आहे. चित्रपटाच्या कथानकात साजेसा प्रसंग घडला आहे. मधुकरच्या घरी पत्नी, दोन मुले व दोन मुली असे कुटुंब आहे. घरात दारिद्र्याने ३५ वर्षापूर्वीच ठाण मांडले आहे. अशातच अनिताच्या विवाहाचा प्रस्ताव आला. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील काशिनाथ घुबडे यांचे स्थळ आले. एकमेकांची पसंती झाली. लग्नाचा बेत आखण्यात आला. मात्र परिस्थिती आड येत होती. आईवडिलांना मुलीचे लग्न मोडणार तर नाही ना, ही चिंता सतावत होती. अशातच मुलीचे वडील मधुकर शिवरकर यांनी श्री पंढरीनाथ देवस्थानच्या व्यवस्थापकांशी संपर्क केला. येथील जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी आस्थेने विचारपूस केली. मुलीकडील परिस्थिती हलाखीची होती. मात्र काशिनाथ घुबडे याचे आईवडील हयात नसल्याची बाब समोर आली. नियोजित वधू-वराचे लग्न झालेच पाहिजे, असा दृढनिश्चय करण्यात आला. या लग्न समारंभाला ऐन विवाहाच्या तीन तास अगोदर लोकवर्गणीचा मार्ग अंगिकारण्यात आला. पाहतापाहता लोकवर्गणी जमा झाली. गावकऱ्यांनी आपल्याच मुलीचे लग्न समजून गावातील सरपंच रिता जिलटे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी लग्नात हिरहिरीने भाग घेतला. यात गावकऱ्यांचा पुढाकारही लाभला. सर्वांचा हातभार लागत असल्याचे पाहून मुलीकडचे पाहुणेही सद्गतीत झाले. वधूच्या आईवडिलांचे डोळे पाणावले. लोकवर्गणीतून पार पडलेल्या विवाह सोहळ्याला समाधानाची सोनेरी किरण लाभली. एखाद्या चांगल्या व श्रीमंत कुटुंबातील लग्नाला लाजविणारा अनिताचा विवाह झाला. तिला निरोप देताना विवाहाला उपस्थितीत असलेले सारेजण हजर होते. एका गरीब मुलीच्या सुखी संसारासाठी आपला हातभार लागला. याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होते.
विशेष म्हणजे एकेकाळी मधुकर शिवरकर यांची विसापुरात एकमेव पान टपरी होती. २५ वर्षापूर्वी त्याच्या टपरीवरच वर्तमानपत्र वाचले जात होते. विड्याचे पान बनविण्यात त्याचा हातखंडा होता. त्याच्या पान टपरीवर पान खाणाऱ्यांची गर्दी व्हायची. त्याच व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र उधारीमुळे त्याच्या व्यवसायाचे कंबरडे मोडले. परिस्थितीचे दृष्टचक्र ओढवले. सढळ हाताने मदत करणाऱ्यांवर याचना करण्याची वेळ आली. तरीही माणुसकी जिवंत असल्याचा पुरावाच विसापूरकरांनी दिला आहे. पंचक्रोशीत हा प्रसंग दिर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला आहे.