आर्थिक विवंचनेतून इसमाची आत्महत्या
By Admin | Updated: November 30, 2015 00:55 IST2015-11-30T00:55:19+5:302015-11-30T00:55:19+5:30
तालुक्यातील विसापूर येथील एका इसमाने घरी कोणी नसताना एका खोलीत केबल ताराने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आर्थिक विवंचनेतून इसमाची आत्महत्या
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील एका इसमाने घरी कोणी नसताना एका खोलीत केबल ताराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजता उघडकीला आली. मृताचे बालकदास एकनाथ बोरकर (५२) असे असून त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
बालकदार बोरकर बल्लारशाह प्लायवूड कंपनीत कार्यरत होते. मागील आठ वर्षापासून प्लायवूड कंपनी बंद आहे. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. अशातच ते गुजरात राज्यातील एका कंपनीत कामाला लागले होते. घरापासून व कुटुंबापासून दूर राहत असल्याने त्यांचा मानसिक तणाव वाढला होता. अलीकडेच त्यांच्या मुलीचे लग्न जुळले, त्यामुळे कमी पगारात मुलीचे लग्न कसे करणार याची चिंता सतावत होती.
मागील दोन महिन्यापासून चिंतेने मनात घर केल्यामुळे व आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी कंपनीचे काम सोडून ते विसापुरात वास्तव्याला आले. आज सायंकाळच्या सुमारास मुलगा बाहेर गेला होता. पत्नी व मुलगी शेजाऱ्याकडे गेली होती. याच संधीचा फायदा घेत बालकदास यांनी घराचे दरवाजे बंद करून आतील खोलीत केबल तारेने गळफास घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. विसापूर पोलीस चौकीचे जमादार भगत यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रकरणी विसापूर पोलीस चौकीत मर्ग दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)