‘तिच्या’ उपचारासाठी मदतीचा ओघ सुरू
By Admin | Updated: May 28, 2017 00:43 IST2017-05-28T00:43:37+5:302017-05-28T00:43:37+5:30
एका युवतीला दुर्धर आजाराच्या उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज आहे. तिच्या उपचाराकरिता तिचा भाऊ धडपड करीत आहे.

‘तिच्या’ उपचारासाठी मदतीचा ओघ सुरू
मदतीचा हात : ‘लोकमत’च्या वृत्ताची ठाणेदारांनी घेतली दखल
आशिष घुमे । लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : एका युवतीला दुर्धर आजाराच्या उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज आहे. तिच्या उपचाराकरिता तिचा भाऊ धडपड करीत आहे. मात्र, त्याची धडपड अपूर्ण आहे. वरोराच्या ठाणेदारांनी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित वृत्ताची दखल घेत १० हजार रुपयांची मदत केली आहे. तसेच प्रहार संघटनेने मुंबई येथे राहण्याची व्यवस्था केली आहे. तसेच त्यांना खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनीही साथ दिली आहे.
‘लोकमत’ने ‘बहिणीच्या उपचारासाठी भावाची धडपड’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर वरोरा येथील ठाणेदार विलास चव्हाण यांनी बहिणीच्या उपचाराला मदत म्हणून रवी पाटील यांना १० हजार रुपयांची मदत केली. तर आ. बच्चू कडू प्रणित प्रहार संघटनेतर्फे त्यांची मुंबई येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली .
वरोरा शहरातील रहिवासी होमगार्ड रवी पाटील यांची आपल्या बहिणीच्या उपचारकरिता सुरु असलेली धडपड पाहता ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्तामध्ये सामाजिक संघटनांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनेकजण दानशूरपणा आणि मदत करण्यासाठी प्रसिद्ध असले तरी त्यांनी यावेळी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे शहरात सामाजिक कार्यकर्त्यांची, समाजसेवकांची वानवा निर्माण झाल्यासारखी परिस्थिती दिसत होती. अशा वेळी वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण यांनी सांमाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. त्यांनी स्वत: १० हजार रुपये रवी पाटील यांना बहिणीच्या उपचारासाठी दिले.
रवी पाटील यांची बहीण निशा प्रमोद मैती रा. चंद्रपूर ही दुर्धर अशा ‘बोनमॅरो’ या आजाराने त्रस्त आहे. तिचा भाऊ रवी पाटील बोनमॅरो दान करणार आहे. त्या शस्त्रक्रियेसाठी व औषधोपचारासाठी त्यांना १० लाख रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. त्यांच्याकडे असलेले किडूकमिडूक पैसे उपचारावर खर्च केले. तसेच ते कर्जबाजारीही झाले. पण आता पुढील उपचारकरिता काय करावे, असे संकट त्यांच्या समोर उभे ठाकले आहे. पैसे नसल्याने रवी पाटील यांनी पैशासाठी अनेकांकडे हात पसरविला. पण निराशेशिवाय त्याच्या हाती काहीच लागले नाही.
त्यांच्या बहिणीची तब्बेत २१ मे रोजी अधिकच खालावल्याने तिला चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यावेळी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित बातमीमुळे त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या सामाजिक जाणिवा जागृत झाल्या. त्यांनी मुबई येथील एका रुग्णालयात तिचा अत्यंत कमी खर्चात उपचार होईल, यासाठी प्रयत्न केले. तिची प्रकृती बघता तिला लवकरात लवकर मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला दिला आहे. रवी पाटील यांनी मुंबईला जाण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनामदत मागितली. पण कोणीही पुढे आले नाही. ही बाब माहिती होताच प्रहारचे विदर्भ प्रमुख गजानन कुबडे यांनी मुंबई येथे त्यांची राहाण्याची व्यवस्था करून दिली असून ते मुंबई येथे रवाना झाले आहे. दुसऱ्या दिवशी वरोराचे ठाणेदार चव्हाण यांनी स्वत:जवळील १० हजार रुपये दिले . सध्या निशा मुंबई येथे उपचार घेत असून पैशाअभावी तिचा उपचार थांबलेला आहे. पाटील यांनी सामाजिक संस्था व दानशुरांकडे मदतीची मागणी केली आहे.