आरोग्य उपकेंद्र बनले ठेकेदाराचे गोडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:23 IST2021-02-20T05:23:56+5:302021-02-20T05:23:56+5:30

चिमूर : ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्याच्या सोयी पुरविल्या जातात. यामध्ये गावाची संख्या ...

The health sub-center became the contractor's godown | आरोग्य उपकेंद्र बनले ठेकेदाराचे गोडाऊन

आरोग्य उपकेंद्र बनले ठेकेदाराचे गोडाऊन

चिमूर : ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्याच्या सोयी पुरविल्या जातात. यामध्ये गावाची संख्या जास्त असल्याने आरोग्य केंद्राच्या दिमतीला उपकेंद्रांमधून आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जातात. मात्र खडसंगी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या शेंडेगाव उपकेंद्राची इमारत मागील वर्षभरापासून रुग्णांच्या सेवेऐवजी ठेकेदारांचे गोडाऊन बनली आहे. यामुळे आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले आहे.

खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३२ गावांचा समावेश आहे. या आरोग्य केंद्रातून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. या केंद्राचा व्याप जास्त असल्याने मजरा, बोथली, आमडी व शेंडेगाव आरोग्य उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. या उपकेंद्रातून ग्रामीण भागातील नागरिक, महिलांना आरोग्य सुविधा पुरविला जातात. त्यापैकी शेंडेगाव येथे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने लाखो रुपये खर्च करून उपकेंद्रांची सुसज्ज इमारत उभारली. या उपकेंद्रात एक एनएम, एमपीडब्लू, मदतनीस असे कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या उपकेंद्रांच्या इमारतीचा वापर वर्षभरापासून एका कंत्राटदाराचे मजूर व सळाख, गिट्टी, रेती, साहित्य ठेवण्यासाठी केला जात आहे. परिणामी या परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबतची तक्रार पंचायत समितीचे उपसभापती रोशन ढोक यांनी संबंधित आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी व संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे केली. मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.

कोट

पंचायत राज समिती चिमूर दौऱ्यावर येत असताना या इमारतीतील साहित्य बाहेर काढण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी लाखो रुपये खर्चून बांधलेल्या शासकीय इमारतीत विना परवानगीने मागील अनेक महिन्यापासून कंत्राटदाराचे साहित्य ठेवण्यात आले आहे. संबंधित आरोग्यसेविका, विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई करून इमारतीच्या नुकसान भरपाईची रक्कम वसूल करण्यात यावी.

- रोशन ढोक, उपसभापती पंचायत समिती चिमूर.

Web Title: The health sub-center became the contractor's godown