जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा

By Admin | Updated: August 19, 2015 01:18 IST2015-08-19T01:18:48+5:302015-08-19T01:18:48+5:30

सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि नियमित आरोग्यसेवा पुरविण्याच्या उदात्त हेतूने शासनाने दुर्गम भागात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली.

The health service of the district will be destroyed | जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा

जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा


चंद्रपूर: सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि नियमित आरोग्यसेवा पुरविण्याच्या उदात्त हेतूने शासनाने दुर्गम भागात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली. मात्र या केंद्राना आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुशेषांचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यात अशा डॉक्टरांची तब्बल ३९ पदे रिक्त असल्याने संपूर्ण जिल्हाभर आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
जिल्ह्यात आजघडीला एकूण ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र अस्तित्वात आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात दोन या प्रमाणे ११६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र अवघे ७७ डॉक्टर कार्यरत आहेत. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांचाही समावेश आहे. रिक्त असलेल्या ३९ डॉक्टरांपैकी २० जण हे पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी गेलेत. तर तीन डॉक्टरांवर विविध आरोप असल्याने त्यांना जिल्हा कार्यालयाशी संलग्न करण्यात आले.
त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. दुसरीकडे डॉक्टरांच्या या अनुशेषामुळे रुग्णांना तत्काळ उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे. परगावाहून येणाऱ्या डॉक्टराची वाट पाहून थकल्यानंतर रुग्णांना खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागत आहे. कोरपना या आदिवासीबहुल तालुक्यात तर आरोग्य सेवेची मोठी दैनावस्था दिसून येते. या तालुक्यात नारंडा, विरुर (गाडेगाव) आणि मांडवा असे तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यापैकी नारंडा येथील नियमित वैद्यकीय अधिकाऱ्याने चार महिन्यांपूर्वी राजीनामा दिला तर दुसरा वैद्यकीय अधिकारी बऱ्याच दिवसांपासून दिर्घ रजेवर आहे. त्यामुळे वनसडी येथील आयुर्वेदीक दवाखान्यातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याकडे नारंडाचा प्रभार सोपविण्यात आला. परिणामी वनसडीचे आयुर्वेदीक रुग्णालय आता कुलूप बंद अवस्थेत आहे. दुसरी बाब म्हणजे प्रभार दिल्यानंतरही त्यांच्याकडे वित्तीय अधिकार नसल्याने सुमारे अडीच महिन्यांपासून नारंडा केंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांचे वेतन अडले आहे.
मांडवा आरोग्य केंद्रातील एक डॉक्टर आरोग्य सेविकेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात अडकल्याने त्याला मुख्यालयाशी जोडण्यात आले. त्यामुळे या आरोग्य केंद्रात शुकशुकाट पसरल्याने अखेर पारडी आणि कोडशी येथील आयुर्वेदीक दवाखाने बंद करुन त्या दोघांची मांडवाला सेवा घेणे सुरु आहे. येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे जिवती तालुक्याचा आधीच प्रभार असताना आता नव्याने मांडवाचाही प्रभार देण्यात आला, तर मांडवाच्या एका डॉक्टरकडे नारंडा केंद्रातील वित्तीय अधिकारी सोपविण्यात आले. एकंदरी एकाच डॉक्टरला ५० किमी अंतरावरील दोन केंद्रात फिरस्तीवर दाखविण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र एकाच ठिकाणाहून सारे सुरु आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तालुक्यात साथीचे तुरळक आजार वाढले आहेत. ही लागण अधिक उद्भवण्याची परिस्थिती असताना तालुक्यात मात्र डॉक्टरांची वाणवा प्रकर्षाने जाणवू लागली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The health service of the district will be destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.