शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: February 5, 2016 00:43 IST2016-02-05T00:43:45+5:302016-02-05T00:43:45+5:30
आदिवासी प्रकल्प विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे शासकीय आश्रमशाळेत शिकत असलेल्या मुलामुलींना पुरेशा सोयी - सुविधा तर मिळत नाही,....

शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
प्रकल्प विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष : थंड पाण्याने करावी लागते आंघोळ
शंकर चव्हाण/ संघरक्षीत तावाडे जिवती
आदिवासी प्रकल्प विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे शासकीय आश्रमशाळेत शिकत असलेल्या मुलामुलींना पुरेशा सोयी - सुविधा तर मिळत नाही, त्याचप्रमाणे गरम पाणी करण्यासाठी प्रकल्प विभागाने सोलर यंत्राचे चार संच बसविले आहे. मात्र गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून हे चारही सोलर यंत्र बंद अवस्थेत आहे. विद्यार्थ्यांना आपले आरोग्य धोक्यात घालून चक्क थंड पाण्याने आंघोळी कराव्या लागत आहे.
जिवती येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाची सोय असून आजघडीला २८६ पटसंख्या व २६२ निवासी विद्यार्थी वसतिगृहात राहत असले तरी स्वतंत्र्य निवासाची सोय नाही. मुलींसाठी फक्त वसतिगृहाची सोय आहे. मुलांना त्याच खोलीत शिक्षणाचे धडे व तिथेच निवासाचे कार्य करावे लागते. दर्जेदार शिक्षण व निवासाची चांगली सोय पहाडावरील आदिवासी मुलांना मिळाव्यात, यासाठी आदिवासी प्रकल्प विभागाने शासकीय आश्रमशाळेची निर्मिती केली असली तरी सोयीसुविधाअभावी आश्रमशाळा समस्यांचे माहेरघर झाले आहे.
शौचालयाची दुरवस्था
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शौचालयाची सोय असली तरी त्यातील दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे अर्धेअधिक विद्यार्थी बाहेरच शौचविधीसाठी जात असल्याचे कळते. शौचालयावरील छताची दयनीय अवस्था झाली आहे. त्या ठिकाणच्या विद्युत तारासुद्धा उघड्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. हीच अवस्था स्नानगृहाची आहे. त्यामुळे काही मुले स्नानगृहाबाहेर उघडयावरच आंघोळ करीत असल्याचे चित्र पहायला मिळाले.
जबाबदार कोण
आश्रमशाळेतील सोयी-सुविधांअभावी होणारे हाल, निवासाचे प्रश्न, दूषित पाण्यामुळे होणारे आजार, लाखो रुपये खर्च करुन सोलर यंत्र बसविले. पण तेही अल्पावधीतच बंद पडल्याने विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. या विविध समस्यामुळे विद्यार्थ्यांवर अनेक संकट ओढवत आहे. या प्रकाराला जबाबदार कोण?
मुलीच्या वसतिगृहालगत अस्वच्छता
मुली राहत असलेल्या वसतिगृहालगत व मागच्या बाजूला असलेला केरकचरा व घाणीमुळे डासांचे प्रमाण तर वाढलेच, पण साप, विंचूसारख्या प्राण्यांची भीती बाळगावी लागते. एकादी वेळेस विद्युत पुरवठा खंडित झाला तर मोठी अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. वसतिगृहात व बाहेर वरांड्यात पुरेसा प्रकाश मिळेल अशी उपकरणे तर नाहीच पण प्रकल्प विभागाकडून मिळालेले जनरेटरसुद्धा बंद अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीवर आला आहे.
शुद्ध पाणीही मिळत नाही
शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सृदुढ व सुरक्षित रहावे, यासाठी प्रत्येक शाळेत वॉटर फिल्टरची सोय असणे आवश्यक आहे. मात्र शाळेत वॉटर फिल्टरच नसल्याने विद्यार्थ्यांना दुषित पाण्यावरच तहान भागवावी लागते. त्यामुळे अनेकांना आजार जडत असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. असे असतानाही आजवर याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही, हे येथील विद्यार्थ्यांचे दुर्दैव.