डेरा आंदोलनावर तोडगा काढण्याचा ‘तो’ प्रस्ताव फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:26 IST2021-03-14T04:26:12+5:302021-03-14T04:26:12+5:30
शासनाकडून दबाव आणल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे यांनी डेरा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यांची समिती गठित केली ...

डेरा आंदोलनावर तोडगा काढण्याचा ‘तो’ प्रस्ताव फेटाळला
शासनाकडून दबाव आणल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे यांनी डेरा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यांची समिती गठित केली आहे. यामध्ये विभाग प्रमुख डॉ. मनोहर भेंडे, डाॅ. राजेंद्र सुरपाम तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड यांचा समावेश आहे. आंदोलनावर तोडगा काढण्याच्या हेतूने डाॅ. भेंडे यांनी जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्याशी चर्चा करून जुन्या कंत्राटदारांना मुदतवाढ देण्याचा तसेच त्यांच्यामार्फत कामगारांचे पगार देण्याचा प्रस्ताव ठेवला. दोन्ही दोषी कंत्राटदारांना मुदतवाढ दिल्याने कामगार पुन्हा किमान वेतनापासून वंचित राहतील. अशा प्रकारे दोषी कंत्राटदारांना मुदतवाढ देणे नियमबाह्य असून, कामगारांनी केलेल्या कामाचे पूर्ण दाम मिळाल्याशिवाय डेरा आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका देशमुख यांनी व्यक्त केली.
बॉक्स
आमदार वंजारी पाठपुरावा करणार
शुक्रवारी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिवसेना प्रणीत शिक्षक सेनेचे चंद्रपूर-गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेश नायडू यांनी डेरा आंदोलनाबाबत माहिती दिली. यानंतर आमदार वंजारी यांनी जनविकासचे अध्यक्ष देशमुख यांना फोन करून डेरा आंदोलनातील ५०० कोविड योद्ध्यांच्या थकीत पगारासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा शब्द दिला. काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रितेश ऊर्फ रामू तिवारी व जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. विजया बांगडे यांनीसुद्धा या आंदोलनाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केलेला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या कार्यालयातून डेरा आंदोलनाबाबत पूर्ण माहिती घेतली आहे.
.....