झाडीपट्टी रंगभूमीतील हरहुन्नरी संगीतकार हिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:47+5:302021-04-27T04:28:47+5:30
सावरगाव : झाडीपट्टी रंगभूमीतील नाट्यक्षेत्रात संगीतातील सारेच वाद्य वाजविण्यात निष्णात असलेले एक हरहुन्नरी कलावंत डी.के. पेंटर या नावाने ...

झाडीपट्टी रंगभूमीतील हरहुन्नरी संगीतकार हिरावला
सावरगाव : झाडीपट्टी रंगभूमीतील नाट्यक्षेत्रात संगीतातील सारेच वाद्य वाजविण्यात निष्णात असलेले एक हरहुन्नरी कलावंत डी.के. पेंटर या नावाने नाट्यक्षेत्रात प्रसिद्ध असलेले नागभीड तालुक्यातील तळोधी येथील दादाजी खोब्रागडे (५९) यांचे रविवारी पक्षाघाताने निधन झाले.
डी. के. पेंटर हे मागील ४० वर्षांपासून नाट्यक्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी महाराष्ट्रासह परराज्यातही अनेक नाटके वाजविली. आजतागायत त्यांनी तीन हजारांहून अधिक नाटके वाजवून रंगभूमीची सेवा केली आहे. मानापमान, कट्याळ काळजात घुसली, अयोध्येचा राजा, पाणीग्रहण, मृच्छकटिक आदी शेकडो संगीत नाटके ही त्यांनी वाजविली आहेत. ते हार्मोनियम, ऑर्गन, व्हॉयोलिन, बँजो, ढोलक आदी वाद्य वाजविण्यात निष्णात होते. त्यांनी अनेकांना सदर वाद्यांचे प्रशिक्षणही दिले आहेत. मागील दहा वर्षांपासून सावरगाव येथील तबला वादक नरेश निकुरे यांच्यासोबत त्यांनी हजारांहून अधिक नाटके वाजविली असून ही जोडी झाडीपट्टी रंगभूमीत प्रसिद्ध झाली होती. मात्र मागील वर्षांपासून कोरोनामुळे नाटके बंद पडली. याचा धसका घेऊन ते लकव्याने आजारी पडले होते. यातच त्यांनी रविवारी सकाळच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,जावई असा आप्त परिवार आहे.