दहशत अन् संघर्षाचा सुखद अंत

By Admin | Updated: July 12, 2017 00:39 IST2017-07-12T00:39:39+5:302017-07-12T00:39:39+5:30

वाघ हा केवळ शब्दच तोंडातून काढला तरी भल्याभल्यांचा थरकाप उडतो. तिथे याच वाघाने ब्रह्मपुरी तालुक्यातील सहा-सात गावात अक्षरश: धुमाकूळ घातला.

A happy ending of panic and conflicts | दहशत अन् संघर्षाचा सुखद अंत

दहशत अन् संघर्षाचा सुखद अंत

अखेर नरभक्षक वाघीण पिजराबंद
ग्रामस्थांमध्ये आनंद   वाघिणीला बघायला उसळली गर्दी

रवी रणदिवे । लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : वाघ हा केवळ शब्दच तोंडातून काढला तरी भल्याभल्यांचा थरकाप उडतो. तिथे याच वाघाने ब्रह्मपुरी तालुक्यातील सहा-सात गावात अक्षरश: धुमाकूळ घातला. एक महिन्याहून अधिक दिवस या गावांमधील गावकरी प्रचंड दहशतीत होते. पाच जणांचा बळी गेला. अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पडला. त्यामुळे आधी या नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचा व नंतर जेरबंद करण्याचा निर्णय झाला. वनविभागाची चमू, शार्प शूटर, पोलीस दल व ग्रामस्थांनी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी जंगल पिंजून काढला. तब्बल एक महिन्याच्या या संघर्षानंतर नरभक्षक वाघिणीला पिजराबंद करण्यात आले आणि गावकऱ्यांची दहशत व वनविभागाच्या संघर्षाचा सुखद अंत झाला.
सोमवारी नरभक्षक वाघिणीला पकडण्यात यश आले आणि सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला. परंतु मागील काही महिन्यांपासून या वाघिणीने कसा तांडव घातला व त्यानंतर ज्या घडामोडी घडत गेल्या, ते हा परिसर व जिल्ह्यातील नागरिक कधीच विसरू शकणार नाही.
ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा, बोळधा, पद्मापूर (भूज), कुडेसावली, बल्लारपूर (माल), एकारा आदी भागात या वाघिणीने गेल्या दोन महिन्यांमध्ये अनेकांची झोपमोड केली होती. कुणाला जिवानिशी ठार केले तर कुणाला जखमी केले होते. २८ मार्चला कुडेसावली येथील सोनुजी दडमल यांना जखमी केले होते. १२ जूनला मंगला ईश्वर आवारी या हळदा येथील महिलेस जखमी केले होते. तर १४ जूनला हळदा येथील यशवंत बापूजी चिमूरकर या गुराख्यावर हल्ला करुन जखमी केले होते. १७ जूनला बोडधा येथील क्षीरसागर गजानन ठाकरे या महिलेला ठार केले. २२ जूनला पद्मापूर येथील शौचास गेलेल्या मधुकर टेकाम यास वाघिणीने चक्क फरकटत नेऊन ठार केले होते. वारंवार घडलेल्या घटनेने १६ जूनला हळदावासीयांनी, लहान बालकांपासून म्हाताऱ्यापर्यंत, अशा सर्वांनी मिळून ब्रह्मपुरी- एकारा रोडवर रस्ता रोको आंदोलन केले होते. दुपारपासून सुरू असलेल्या या आंदोलनाने सायंकाळी वेगळेच वळण घेतले होते. वनविभाग व पोलिसांवर गोटमार झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करुन जमावाला पांगवावे लागले होते. त्यात दोन पुरुष व एक महिला जखमी झाले होते. वाघाच्या बंदोबस्तासाठी केलेल्या रस्ता रोको आंदोलाला उग्र रुप धारण होऊन ४९ लोकांना अटक झाली होती. त्यानंतर वाघाने पदमापूर येथे पुन्हा मधुकर टेकाम यांचा बळी घेतल्याने तणाव आणखी वाढला होता. वाघिणीच्या दहशतीमुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम झाला होता.
प्रकरण गंभीर झाल्याने २३ जूनला विधानसभेचे काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. नरभक्षक वाघिणीला ठार मारा, अशी मागणी रेटून धरली. वाघिणीला मारण्याचे आदेश येईपर्यंत आपण येथेच ठाण मांडू, असा इशाराही त्यांनी दिला.
अखेर आमदार वडेट्टीवार यांच्या या आंदोलनाला यश आले. त्याच दिवशी रात्री वाघाला मारण्याचा आदेश निर्गमित झाला. त्यानुसार २४ जूनला पोलीस विभागाचे पाच शॉर्पशुटर पदमापूर भूज परिसरात दाखल झाले आणि वाघिणीची शोध मोहीम सुरू झाली.
चार दिवस वनविभागाच्या पथकाने परिसर पिंजून काढला. मात्र नरभक्षक वाघीण शुटरच्या जाळ्यात आली नाही.
एक-एक दिवस मावळत असतानाही वाघीण सापडत नसल्याने गावकऱ्यांच्या मनातील धडकीही वाढत जाऊ लागली. अखेर २८ जूनला नेमबाजीतील वाघ समजल्या जाणाऱ्या हैदराबाद येथील राष्ट्रीय मानांकन प्राप्त शार्पशुटर नवाब शाफत अली खान यांना पाचारण करण्यात आले व दुसऱ्या दिवशी २९ जूनला नागपूर खंडपिठाने वाघाला मारण्याचे आदेश रद्द करुन बेशुद्ध करण्यात यावे, असा आदेश दिला.
त्यानुसार पाच शॉर्पशुटर व हैदराबाद येथील नवाब शाफत अली, व्याघ्र संरक्षण दल, वनविभागाचे कर्मचारी व मजूर असा शेकडोंचा ताफा जंगल परिसरात दाखल झाला. परिसरातील सहा-सात गावांना लागून असलेल्या जंगलात त्यांनी शोधमोहीम सुरू केली. या शोध मोहिमेलाही १५ दिवस लोटले तरी नरभक्षक वाघीण या पथकाला हुलकावणी देत राहिली.

अशी अडकली वाघीण पिंजऱ्यात
हळदा येथील वल्कीदेव शेतशिवारात रविवारी या वाघिणीने गायीची शिकार केली. सोमवारी ती गाईला घेऊन जाण्यासाठी येणार म्हणून नरभक्षक वाघीण तीच आहे किंवा नाही, याची ओळख पटविण्यासाठी नवाब शफात अली यांनी तीर साधला व वाघिणीच्या मानेवर डॉट मारण्यात ते यशस्वी झाले. १०० मीटरच्या आत ती वाघीण बेशुद्ध झाली. त्यावेळी नवाब शाफत अली खान, रेंजर काटकर, डॉ. कादू यावेळी उपस्थित होते. यावेळी बेशुद्ध असलेली वाघीण तीच आहे, याची खात्री पटल्यानंतर तिला पिंजऱ्यात जेरबंद करून एकारा येथील विश्रामगृह परिसरात नेण्यात आले.

वन्यप्रेमींमध्ये आनंद
पद्मापूर भूज परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला ठार मारण्यासाठी आ. विजय वडेट्टीवार यांनी आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची दखल व गावांमधील स्थिती पाहता वनविभागाने वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर वन्यप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. ठार मारणे हा केवळ एकच उपाय नसून अन्य अनेक उपाय आहे, असे या वन्यप्रेमींचे म्हणणे होते. अखेर हा आदेश रद्द झाला आणि सोमवारी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. वाघिणीचा जीव वाचल्यामुळे वन्यप्रेमींमध्ये आनंद आहे आणि ग्रामस्थांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

जनजीवनावर झाला होता परिणाम
या नरभक्षक वाघिणीमुळे सहा-सात गावांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. तब्बल पाच जणांचा वाघिणीच्या हल्ल्यात जीव गेला होता. अनेक जण जखमी झाले. पाळीव प्राण्यांचाही बळी गेला होता. त्यामुळे ग्रामस्थांच्या जनजीवनावर याचा मोठा परिणाम झाला होता. शेतकरी शेतात जाण्यास घाबरत होते.
 

Web Title: A happy ending of panic and conflicts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.