Half a kilometer of drinking water | पिण्याच्या पाण्यासाठी अर्ध्या किमीची पायपीट
पिण्याच्या पाण्यासाठी अर्ध्या किमीची पायपीट

ठळक मुद्देपरिस्थिती बिकट । प्रशासनाने लक्ष देण्याची ग्राम पंचायतची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
घोडपेठ : येथून जवळच असलेल्या कुडरारा येथे आजही पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावातील महिलांना अर्धा कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. याचा नाहक त्रास विशेषकरून महिलांना होत आहे. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून नळयोजना तयार करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत गोरजातर्फे करण्यात आली आहे.
भद्रावती तालुक्यातील ग्रा. पं. गोरजा अंतर्गत येत असलेल्या कुडरारा (कोंढाळी) येथे पिण्याचे पाणी आणण्यासाठी महिलांना रेल्वे लाईन ओलांडून अर्धा कि. मी. अंतरावर असलेल्या विहिरीवर जावे लागते.
कुडरारा येथे अजूनपर्यंत पिण्याच्या पाण्याची टाकी व नळयोजना अस्तित्वात नाही. गावकऱ्यांच्या त्रासाचे कायमस्वरूपी नियोजन करण्यासाठी ग्रामपंचायत गोरजातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून नळयोजना देण्याकरिता निवेदन देण्यात आले आहे. याकडे आता जिल्हा परिषदेने लक्ष देण्याची मागणी आहे.

फ्लोराईड रिमुव्हल वॉटर फिल्टर निरुपयोगी
कुडरारा येथे राईट वॉटर सोल्युशन (जलस्वराज २) अंतर्गत फ्लोराईड रिमुव्हल वॉटर फिल्टर तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आले होते. त्यामध्ये बोअरचे जोडण्यात आलेले पाणी पिण्यास अयोग्य असल्यामुळे ते पाणी गावकऱ्यांकडून नाकारण्यात आले. या वॉटर फिल्टरला गावाबाहेरील विहिरीवरून पाणी पुरवठा करण्यात यावा, असे ग्रामपंचायतीकडून प्रशासनाला कळविण्यात आले होते. मात्र यादृष्टीने सकारात्मक अशी कुठलीही कार्यवाही झाली नाही. या वॉटर फिल्टरचा कोणताही वापर गावकरी करीत नाहीत. त्यामुळे शासकीय आर्थिक नुकसान होवू नये, या हेतूने कुडरारा येथील फ्लोराईड रिमुव्हल वॉटर फिल्टर लवकरात लवकर काढून नेण्यात यावे, अशी मागणीही ग्रामपंचायत गोरजातर्फे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: Half a kilometer of drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.