चंद्रपूर महानगराचा निम्मा विकास प्रलंबित

By Admin | Updated: February 4, 2015 23:12 IST2015-02-04T23:12:03+5:302015-02-04T23:12:03+5:30

चंद्रपूरला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला. महापौर बसले. आयुक्तही आले. महापालिका झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षांपैकी तीन वर्ष लोटले. या पाच वर्षात चंद्रपूर शहराचा चेहरामोहरा बदलेल;

Half of the development of the Chandrapur metropolitan development | चंद्रपूर महानगराचा निम्मा विकास प्रलंबित

चंद्रपूर महानगराचा निम्मा विकास प्रलंबित

चंद्रपूर : चंद्रपूरला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला. महापौर बसले. आयुक्तही आले. महापालिका झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षांपैकी तीन वर्ष लोटले. या पाच वर्षात चंद्रपूर शहराचा चेहरामोहरा बदलेल; त्यात आमुलाग्र बदल होईल, अशी सर्वांनाच आशा आहे. असे असले तरी या तीन वर्षात महापालिकेने त्या दृष्टीने अद्याप पाऊल उचललेले नाही. विकासकामे होत असली तरी तीन वर्षात शहराच्या तुलनेत त्याची टक्केवारी निम्मीही नाही. लोकमतच्या ‘लोकमत जागर’ या अभियानातून त्याची प्रचितीच आली. चंद्रपूरचे महानगर करण्यासाठी महापालिकेला आणखी बरीच कामे, तीदेखील जलदगतीने करावी लागणार आहे. त्यासाठी प्रसंगी सक्तीचे आणि कठोर पावलेही उचलावी लागणार आहेत.
२०१० मध्ये चंद्रपूरला महानगरपालिकेची घोषणा झाली. त्यानंतर पहिल्यांदाच वॉर्डाचे प्रभाग पाडत महापालिकेची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक झाली. महापौर विराजमान झाले. आयुक्तांनीही आपला पदभार स्वीकारला. महापालिका झाल्यानंतर उत्पन्नाचे स्रोतही वाढले. नागरिकांकडून आकारण्यात येणाऱ्या विविध करातही वाढ करण्यात आली. विविध हेडखाली मिळणाऱ्या निधीतही वाढ झाली. यात भर म्हणून चंद्रपूर शहराच्या पंचशताब्दी महोत्सवानिमित्त राज्य शासनाकडून २५० कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली. यातील पहिला हप्ता म्हणून २५ कोटींचा निधी महापालिकेकडे सुपुर्दही करण्यात आला. आता तरी चंद्रपूर शहराचा कायापालट होईल, अशी आशा चंद्रपूरकरांना होती. मात्र पहिल्या तीन वर्षात चंद्रपूरकरांची ही आशा फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर शहरातील प्रत्येक प्रभागात कितपत विकासकामे झालीत. नागरिकांना आणखी कोणत्या समस्या भेडसावत आहेत. कोणता प्रश्न २५ वर्षांच्या काळातही निकाली निघू शकला नाही, याचा आढावा घेण्याकरिता लोकमतने ‘लोकमत जागर’ हे अभियान सुरू केले. या अभियानाच्या माध्यमातून लोकमत चमूने शहरातील ३३ प्रभागात फेरफटका मारून नागरिकांशी चर्चा केली. त्यांच्या समस्यांना वाचा फोडली. संबंधित प्रभागातील नगरसेवकांशीदेखील चर्चा केली. त्यांचेही पुढील नियोजन जाणून घेतले.
या अभियानात शहरात आणखी बऱ्याच समस्या असून विकासकामांपासून अनेक परिसर अद्यापही वंचितच असल्याचे दिसून आले. विठ्ठल मंदिर प्रभागात सर्वाधिक गंभीर व चिंताजनक समस्या शौचालयाची आहे. मित्र चौक, विठ्ठल मंदिर वॉर्ड या परिसरात अनेकांच्या घरी शौचालय नाही. विठ्ठल मंदिर व्यायाम शाळाजवळ एक सार्वजनिक शौचालय आहे. मात्र या शौचालयाच्या दुरावस्था झाली आहे. हे शौचालय काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आले. त्यामुळे बहुतांश नागरिक रस्त्यावरच शौचास बसलेले असतात. जटपुरा प्रभागात अतिशय गंभीर समस्या अतिक्रमणाची आहे. फारपूर्वीपासून हा परिसर वस्तीचाच होता. जशीजशी लोकसंख्या वाढत गेली, तशी ही वस्ती आणखी दाट होत गेली. या वस्तीत मोकळ्या जागा फारशा दिसत नाही. लोकवस्ती वाढली तसे अतिक्रमणही वाढू लागले. नगरपालिका अस्तित्वात असतानाच याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे होते. मात्र कुणीही या भानगडीत पडले नाही. येथे रस्त्याचे रुपांतर चक्क गल्लीबोळात होत आहे. तुकूम तलाव प्रभाग विकासाच्या बाबतही टोकावरच राहिले. अनेक वसाहतीत नागरिकांची केवळ घरे आहेत. नळ सोडले तर महापालिकेच्या कोणत्याही सुविधा या वसाहतीपर्यंत पोहचल्या नाही. देगो तुकूम प्रभागातील आक्केवार वाडीत महानगरपालिकेने नाल्याच बांधल्या नाहीत. त्यामुळे घराघरातील सांडपाणी रस्त्यावरूनच वाहते. नागरिकांच्या घराजवळच या सांडपाण्याचे डबके तयार झाले आहे. या सांडपाण्यामुळे विहीर व बोअरवेलचे पाणीही दूषित झाले आहे. हॉस्पीटल प्रभागात सर्वाधिक समस्यांचा परिसर म्हणजे जलनगर वस्ती. या वस्तीत रस्ते, नाल्यांचा प्रश्न बिकट आहे. शास्त्रीनगर प्रभागातील नेहरूनगर नावाची वस्ती गावखेड्यापेक्षा मागासलेली आहे. सिव्हील लाईन प्रभागतही रस्त्यांचा बॅकलाग मोठ्या प्रमाणात आहे. इंदिरानगर प्रभागात रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी हे प्रश्न एवढ्या वर्षांनंतरही नगर प्रशासनाला सोडविता आले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभागातील टॉवर टेकडी परिसर तर विकासापासून कोसोदूर असल्याचे दिसून येते. वडगाव प्रभागातही रस्ते व नाल्यांची मोठी समस्या आहे. या परिसरात मोठ्या नाल्यांचाही प्रश्न बिकट आहे. शहरातील उर्वरित प्रभागातही काही अपवाद सोडला तर अशीच अवस्था आहे.
एकूणच चंद्रपूर शहराचा व्याप बघता महापालिका झाल्यानंतरच्या तीन वर्षात निम्मा विकासही शहरात होऊ शकला नाही. रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी यासारख्या मुलभूत गोष्टीच आधीच्या नगरपालिकेला आणि आता महापालिका प्रशासनाला अद्याप पुरविता येऊ शकल्या नाही. पहिल्या पाच वर्षांपैकी तीन वर्ष निघून गेली आहेत. शहरात आणखी बरीच विकासकामे व्हायची आहे. केवळ दोन वर्ष शिल्लक आहेत. विकासकामे करताना महापालिकेला आपली गती जलद करावी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Half of the development of the Chandrapur metropolitan development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.