राजुरा तालुक्यातील गायरान होत आहे नामशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:28 IST2021-05-08T04:28:48+5:302021-05-08T04:28:48+5:30
गुरे चराईची मोठी समस्या : वेकोलीने नाले वळविल्याने चाऱ्याची उगवण क्षमता खुंटली नितिन मुसळे सास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या ...

राजुरा तालुक्यातील गायरान होत आहे नामशेष
गुरे चराईची मोठी समस्या
:
वेकोलीने नाले वळविल्याने चाऱ्याची उगवण क्षमता खुंटली
नितिन मुसळे
सास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या विस्तारीकरणामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी अधिग्रहीत केल्या गेल्या आहेत. शासकीय जमिनी अतिक्रमणाने ग्रासल्या आहेत. वन जमिनीवरसुद्धा अतिक्रमण करून तेथील हिरवळ नष्ट केल्या जात असल्यामुळे तसेच वेकोलीने परिसरातील नाले आपल्या सोईनुसार वळविल्यामुळे पाण्याअभावी गवताची किंवा हिरव्या चाऱ्याची उगवण क्षमता कमी होऊन तालुक्यातील गायरान नामशेष होत आहेत.
शेतकऱ्यांपुढे गुरे चाराईची नवी समस्या उद्भवली आहे.
राजुरा तालुका काळ्या सोन्यासाठी प्रसिद्ध असून, तालुक्याचे नावलौकिक होत असले तरी या वेकोलीच्या विस्तारीकरणामुळे राजुरा तालुक्यातील नागरिकांना अनेक समस्यांना बळी पडावे लागत आहे; परंतु यात मुक्या जनावरांनासुद्धा नाहक बळी जाण्याची वेळ येत आहे. अशाच औद्योगिकरणाची एक समस्या म्हणजे परिसरातील जमिनीचे होत असलेले अधिग्रहण. ज्यामुळे परिसरातील जनावरांना खाण्यासाठी चारा व पिण्यासाठी पाण्याची भटकंती करावी लागत असून, परिसरातील गायरान हद्दपार होत असल्याचे दिसून येत आहे.
वेकोलीने मोठ्या प्रमाणात जमिनी अधिग्रहीत केल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे गावठाण विस्ताराची गरज भासत आहे. प्रत्येकाला राहायला घर हवंच म्हणून गावात मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण केल्या जात आहे. अतिक्रमिकांनी शेकडो हेक्टर जमीन गिळंकृत केली आहे.
परिसरातीत मोठ्या प्रमाणात वन जमिनी होत्या; परंतु बऱ्याच दिवसांपासून या वन जमिनीवर कास्त करून त्या जमिनी धनदांडग्यांनी बळकावून घेतल्या आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने उभे होत असल्यामुळे मोकळ्या जमिनीचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील जनावरांकरिता चराईसाठी गायराने शिल्लक राहिली नाही. वेकोली परिसरात वेकोलीने आपल्या सोईनुसार नाले वळविल्यामुळे संपूर्ण नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे परिसरात पाण्याची पातळी अत्यंत खालावल्याने या ठिकाणी गवत किंवा हिरव्या चाऱ्याची उगवण क्षमता नष्ट झाली आहे.
बॉक्स
शहरी भागात कचराच जनावरांचा चारा
शहरी भागात तर जनावरांना चारा मिळत नसल्यामुळे ते शहरात फेकलेल्या कचऱ्यावर जगत आहेत. कचऱ्यातील प्लास्टिक व कागद ही जनावरे मोठ्या प्रमाणात खात असल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिक खाल्ल्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होत असला तरी याकडे लक्ष द्यायला कुणाला सवड नसल्याचे दिसते.