मुलींनो, आत्मविश्वासाने आयुष्याला सामोरे जा!

By Admin | Updated: March 8, 2016 00:50 IST2016-03-08T00:50:27+5:302016-03-08T00:50:27+5:30

मुलगी वयात येताच तिच्यात मानसिक व शारिरीक बदलाची प्रक्रिया सुरु होते. त्यांच्यात आकर्षण वाढते.

Guys, confidently face life! | मुलींनो, आत्मविश्वासाने आयुष्याला सामोरे जा!

मुलींनो, आत्मविश्वासाने आयुष्याला सामोरे जा!

किशोरींचे प्रशिक्षण : अश्विनी बेले यांचे मार्गदर्शन
बल्लारपूर : मुलगी वयात येताच तिच्यात मानसिक व शारिरीक बदलाची प्रक्रिया सुरु होते. त्यांच्यात आकर्षण वाढते. मनाची घालमेल होते. अशावेळी पालकांनी समजुतदारपणा दाखविणे गरजेचे आहे. मुलींच्या सर्वांगीण विकासाचे साधन शिक्षण आहे. मुलींनोे आत्मविश्वासाने व निर्भयपणे जीवनाला सामोरे जाण्याची मानसिकता बाळगा, असे मार्गदर्शन विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी बेले यांनी सोमवारी किशोर मुलींच्या प्रशिक्षण कार्यक्रमात केले.
बल्लारपूर पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने विसापूर येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात किशोरी मुलींचे प्रशिक्षण शिबिर पार पडले. यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. शिबिराचे उद्घाटन बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच रिता जिलटे होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सुनील रोंगे, सहाय्यक गटविकास अधिकारी संध्या दिकोंडवार, प्रकल्प अधिकारी वंदना दुधाने, आरती जगताप, कल्पना देवगडे, मार्गदर्शक अ‍ॅड. जावेद शेख, डॉ. अश्विनी बेले, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, सुरेखा कोडापे, सरिता झाडे, नंदा शेंडे, मंजुळा कन्नाके, उज्ज्वला कोडापे, नीता वनकर, शशिकला खिरटकर, रेखा ढेंगळे यांची उपस्थिती होती.
यावेळी कुटुंब नियोजन व लैंगिक प्रशिक्षण यावर डॉ. अश्विनी बेले, कौटुंबिक हिंसाचार व कायदेविषयक बाबी यावर अ‍ॅड. जावेद शेख, विकासात महिलांचे योगदान यावर संध्या दिकोंडवार तर विविध योजनाची माहिती कल्पा देवगडे यांनी दिली. प्रास्ताविकातून शशिकला खिरटकर यांनी मार्गदर्शन शिबिरांची भूमिका मांडली. संचालन रेखा ढेंगळे यांनी तर आभार शालिनी नांदे यांनी मानले. यावेळी शालेय विद्यार्थिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Guys, confidently face life!