राष्ट्रसंताच्या भारतरत्न पुरस्कारासाठी गुरुजीचा लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:23 IST2021-01-02T04:23:56+5:302021-01-02T04:23:56+5:30
चिमूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारत देशाचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ २६ जानेवारी २०२१ ला गणराज्य दिनाच्या ऒचित्यावर ...

राष्ट्रसंताच्या भारतरत्न पुरस्कारासाठी गुरुजीचा लढा
चिमूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारत देशाचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ २६ जानेवारी २०२१ ला गणराज्य दिनाच्या ऒचित्यावर प्रदान करावा, अशी मागणी राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचारकृती साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजेंद्र मोहितकर गुरुजी यांनी केली आहे. मागील अनेक वर्षांपासून ते यासाठी लढा देत आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान मिळावा, अशी मागणी सर्वप्रथम २००३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान यांना लेखी निवेदन पाठवून केली. तेव्हापासून आजपर्यंत गेली १७ वर्षे सातत्याने या मागणीच्या अनुषंगाने ते पञव्यवहार व पाठपुरावा करीत आहेत. विदर्भ व महाराष्ट्रातील अनेक खासदार व आमदारांना तसेच महाराष्ट्र व भारत सरकारला हजारो निवेदने पाठविली. साहित्य संमेलनाचे ठराव, सामाजिक संस्था, संघटनांनी केलेल्या मागण्यांबाबत शासनाला अवगत केले. या मागणीच्या अनुषंगाने लोकसभेत १५ मार्च २००५ ला प्रश्नोत्तराच्या काळात प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर तीनवेळा या मागणीवर लोकसभेत प्रश्न उपस्थित करून चर्चा झालेली आहे. दोनवेळा विदर्भातील खासदारांचे शिष्टमंडळ तत्कालीन राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भेटले. यापूर्वी अनेकदा लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पत्रेही पाठविली आहेत. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत अशासकीय ठराव व विविध संसदीय आयुधांचा वापर करून प्रश्न उपस्थित करण्यात येऊन सविस्तर चर्चा झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने ८ जून २००६ रोजी एक शिफारसपत्र केंद्राच्या गृहविभागाला पाठविले आहे. गृहविभागाने २७ एप्रिल २०१२ ला पंतप्रधान कार्यालयाला शिफारस प्रस्ताव पाठविलेला आहे. परंतु या मागणीवर गेल्या १७ वर्षांच्या कालखंडात निर्णय होऊ शकला नाही. आजीवन ब्रह्मचर्य पाळून समाज व राष्ट्रहितासाठीच राष्ट्रसंतांनी कार्य केले. समाजात सदैव समन्वय साधण्याचे त्यांनी कार्य केले. म्हणून आजही त्यांची पुण्यतिथी, जयंती एकोप्याने समाजातील सर्व लोक साजरी करतात, अशा थोर क्रांतिकारी महामानवास भारत सरकारने येत्या २६ जानेवारी २०२१ ला गणराज्य दिनाचे ऒचित्य साधून भारतरत्न प्रदान करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.