शाळा सोडून गुरुजी वेगळ्यात कामात
By Admin | Updated: August 1, 2014 00:13 IST2014-08-01T00:13:08+5:302014-08-01T00:13:08+5:30
अतिदुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. कार्यरत शिक्षकांनी गावातील सुशिक्षितांकडे शाळांचा ‘चार्ज’ दिला असून ते पॉलिसी, फ्लॅटसह अन्य कामात गुंतले

शाळा सोडून गुरुजी वेगळ्यात कामात
प्रशासनाचे दुर्लक्ष : ज्ञानदानासोबत शेतीचा जोडधंदा
चंद्रपूर : अतिदुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. कार्यरत शिक्षकांनी गावातील सुशिक्षितांकडे शाळांचा ‘चार्ज’ दिला असून ते पॉलिसी, फ्लॅटसह अन्य कामात गुंतले असल्याचे चित्र आहे. अनेक शिक्षक सध्या शेतीच्या कामातही व्यस्त आहेत. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांशी साटेलोटे असल्याने दुर्गम भागातील शिक्षकांचे चांगलेच फावत आहे.
जिवती, पोंभूर्णा, चिमूर, कोरपना, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीडसह अन्य तालुका मुख्यालयापासून बऱ्याच अंतरावर आहे. या तालुक्यांतीलच दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. जिल्हा परिषदेचे तर सोडाच पंचायत समित्यांचे शिक्षण विभागाचे अधिकारी कधी जात नाही. हीच संधी साधून मुख्याध्यापक, शिक्षकांसोबत अन्य कर्मचारीही शाळेला बुट्टी मारतात. आता तर यापुढे जावून काही शिक्षक, मुख्याध्यापकांनी आपापली दुकाने सुरू केली आहेत.शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकासह अन्य कर्मचारी पॉलिसी, फ्लॅट, शेतीविक्रीच्या कामात लागले आहेत. शाळेची दैनंदिन कामे व्यवसायात आड असल्याने त्यावर या कर्मचाऱ्यांनी तोडगा काढला आहे. गावातीलच डीएड, बीएड झालेल्या तरुणांना या शिक्षकांनी आपल्या शाळेवर महिन्यावारीने रुजू करवून घेतले जाते. त्यांना तीन- चार हजार रुपये मानधनही दिले जाते. या मानधनातून त्यांचा शिकविण्याचा सराव होत असून पैसेही मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेतील एका विभागाच्या पथकाने दुर्गम भागातील एका शाळेला भेट दिली. तेव्हा शाळेत खरा शिक्षक सोडून दुसराच कर्मचारी दिसला. त्याला विचारणा केली असता त्याने आपण खरे शिक्षक नसल्याचे सांगून आपण मानधनावर शिकवत असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर परिसरातील अनेक जिल्हा परिषद शाळांत असेच प्रकार सुरू असल्याचेही त्या युवकाने सांगितले. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची साखळीच असल्याने असे प्रकार दुर्गम भागात सरार्सपणे सुरू आहेत. (शहर प्रतिनिधी)