मराठी शिकविणाऱ्या गुरूजींची मुले शिकतात इंग्रजी शाळेत
By Admin | Updated: May 22, 2015 01:22 IST2015-05-22T01:22:52+5:302015-05-22T01:22:52+5:30
एकीकडे पटसंख्येमुळे जिल्हा परिषद शाळांचे भवितव्य धोक्यात आले असताना त्याच शाळांत शिकविणाऱ्या शिक्षकांची मुले मात्र खासगी इंग्रजी शाळांमध्ये शिकत असल्याचे विपरीत चित्र या भागात पहायला मिळते.

मराठी शिकविणाऱ्या गुरूजींची मुले शिकतात इंग्रजी शाळेत
वनसडी: एकीकडे पटसंख्येमुळे जिल्हा परिषद शाळांचे भवितव्य धोक्यात आले असताना त्याच शाळांत शिकविणाऱ्या शिक्षकांची मुले मात्र खासगी इंग्रजी शाळांमध्ये शिकत असल्याचे विपरीत चित्र या भागात पहायला मिळते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. इंग्रजी शाळांमुळे अंगणवाडी व मराठी शाळेला मुले मिळत नाहीत. कमी पटसंख्येमुळे या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. असेच चित्र कोरपना तालुक्यात पहावयास मिळते. चार-पाच शाळांमध्ये तर विद्यार्थी संख्या १० च्या आत आहे. कुठे तीन-चार विद्यार्थी आहेत. या शाळेवर मासिक खर्च लाखाच्या वर आहे. वर्ग चार विद्यार्थी चार आणि शिक्षक दोन या दोन शिक्षकांचा पगार लाखाच्या वर आहे.
दिवसेंदिवस इंग्रजी शाळांच्या प्रभावामुळे मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. मराठी शाळेत कार्यरत शिक्षक आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यासाठी तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा रस्ता पकडून खुशाल ते या ठिकाणाहून ये-जा करतात. त्यांचा स्वत:चाच विश्वास मराठी शाळांतील शैक्षणिक दर्जावर नाही. मग इतरांनी तो का ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेहमीच कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाचा प्रश्न गाजत असतो. पण त्याच्या मुळाशी कोणी जाण्याचा प्रयत्न केला नाही. आज प्रत्येक विभागातील कर्मचारी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणाहून ये-जा करताना दिसून येतात. आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यासाठी सगळ्यांशी तडजोड करुन आपले वास्तव्य शहरात करतो.
जो शिक्षक ४०-५० किलोमिटर अंतरावरुन ये-जा करतो, त्या शिक्षकांची मानसिकता वर्गात शिकविण्याची राहील काय? त्याला पुन्हा परत जाण्याची घाई राहील. मग अशा शाळेत मुले घडणार कशी? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. एवढ्या अंतराहून ये-जा केल्याने त्यांना सहाजिकच थकवा जाणवायला लागेल. त्यामुळे शाळेत लक्ष कमी व ये-जा करण्यात जास्त, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची भूमिका सुद्धा तीच असते. गुरुजी आपली मुले इंग्रजी शाळेत पाठवितात मग आमची मराठी शाळेत का? असा प्रश्न शाळेत विद्यार्थी दाखल करताना पालकांकडून विचारला जातो. इंग्रजी शाळेचा वाढता प्रभाव लक्षात घेता मराठी शाळेचे महत्व कमी झालेले दिसते.
शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती नसो पण किमान कमीत कमी अंतराहून ये-जा केल्यास त्याचा फायदा शिक्षकांना आणि शाळेला सुद्धा होईल. द्विशिक्षकी जिल्हा परिषद शाळेची तर अवस्था अतिशय दयनीय आहे. नावाला दोन शिक्षक, पण खऱ्या अर्थाने एकच शिक्षक तेथे काम करताना दिसतो.(वार्ताहर)