कोरोनानंतर ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तंटामुक्ती मोहिमेला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST2020-12-22T04:27:44+5:302020-12-22T04:27:44+5:30
मूल: कोरोनाच्या काळात गावागावात शांतता निर्माण करणारी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे काम बंद होते. तब्बल १० महिन्यांनंतर सदर ...

कोरोनानंतर ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तंटामुक्ती मोहिमेला ब्रेक
मूल: कोरोनाच्या काळात गावागावात शांतता निर्माण करणारी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे काम बंद होते. तब्बल १० महिन्यांनंतर सदर मोहिमेला गती मिळेल, अशी आशा होती. मात्र नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने मोहिमेला नवसंजीवनी मिळण्याऐवजी ब्रेक लागला आहे.
छोट्या छोट्या कारणावरून निर्माण होणाऱ्या तंट्याचे पर्यवसान मोठ्या तंट्यात होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेमुळे मूल तालुक्याबरोबरच जिल्ह्यात देखील अवैध धंद्याला आळा बसून गावागावात शांतता निर्माण झाल्याचे दिसून आले होते. सकारात्मक परिणाम दिसल्याने ही मोहीम यशस्वी झाल्याचे वाटत होते. माञ गेल्या १० महिन्यापासून ही मोहीम कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम थंड्याबस्त्यात आली होती. कोरोनाचे प्रमाण कमी होत असल्याने जनजीवन सुरळीत होताना दिसत आहे.त्यामुळे ही तंटामुक्त मोहीमेला नवसंजीवनी मिळेल, अशी आशा होती. मात्र शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्याने पुन्हा सदर मोहीम थंड्याबस्त्यात आली आहे. शांततेकडून समृद्धीकडे नेणारी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचा शुभारंभ तत्कालीन गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांच्या कल्पनेतून १५ ऑगष्ट २००७ ला करण्यात आला. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम झाल्याने गावा गावात शांतता निर्माण झाली होती. ग्रामीण भागात छोट्या छोट्या कारणावरून निर्माण होणारे तंटे गावातच सुटत होते. तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस पाटील, गावातील सरपंच, गावातून निवडण्यात आलेले तंटामुक्त गाव मोहिमेचे अध्यक्ष आदीच्या माध्यमातून गावातील तंटे गावातच सोडविण्याची तरतूद या मोहिमेत नमूद असल्याने ही अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.
यासाठी शासनाने पुरस्कार घोषित केल्याने गावातील समस्त जनता एकोप्याने कामाला लागली. एकंदरीत गावाच्या शांततेबरोबच गावाच्या विकासाला निधी मिळाल्याने ही मोहीम यशस्वीतेकडे वाटचाल केल्याचे दिसून आले.
बॉक्स
अवैध धंद्याला आळा बसला
ग्रामीण व शहरी भागात व्यसनाधिनतेचे प्रमाण या दरम्यान अधिक वाढल्याने या मोहिमेमुळे सकारात्मक परिणाम दिसायला लागली. अवैध धंद्याला आळा बसला. अवैध दारुविक्रीला लगाम लागला. त्यामुळे गावा गावात शांतता निर्माण व्हायला लागली. शांततेकडून समृद्धीकडे नेणारी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम यशस्वी झाल्याने या मोहिमेला व्यापक स्वरूप मिळाले. माञ गेल्या दोन वर्षांपासून ही मोहीम थंड्याबस्त्यात आहे. ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविली जावी, यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात आली. ही मोहीम सुरू झाली असती माञ गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा फैलाव झाल्याने ही मोहीम पुन्हा थांबली. तब्ब्ल १० महिन्यांनी कोरोनचा संसर्ग कमी होत असल्याचे दिसून आल्याने सदर मोहीम जोमाने सुरू होईल, अशी आशा होती. माञ मपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेला ब्रेेक लागला आहे.