नगराध्यक्षांचे पतीच चालवितात नगरपालिकेचा कारभार

By Admin | Updated: May 18, 2016 00:52 IST2016-05-18T00:52:37+5:302016-05-18T00:52:37+5:30

नगराध्यक्षा जनाबाई पिंपळशेंडे यांनी माझ्यावर लावलेला विनयभंगाचा आरोप धादांत खोटा असून कमिशन न दिल्याच्या कारणावरून चिडून पिंपळशेंडे यांनी

The governor of the municipality runs the head of the municipal corporation | नगराध्यक्षांचे पतीच चालवितात नगरपालिकेचा कारभार

नगराध्यक्षांचे पतीच चालवितात नगरपालिकेचा कारभार

१५ लाखांच्या मागणीसाठी झाला वाद
कंत्राटदार म्हणतात, माझ्यावर लावलेले आरोप खोटे
वरोरा : नगराध्यक्षा जनाबाई पिंपळशेंडे यांनी माझ्यावर लावलेला विनयभंगाचा आरोप धादांत खोटा असून कमिशन न दिल्याच्या कारणावरून चिडून पिंपळशेंडे यांनी माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात खोटी तक्रार केली, असा आरोप कंत्राटदार अमोल सोनेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
याबाबतचा आॅडिओ व व्हिडिओ त्यांनी पत्रकार परिषदेत सादर करून चांगलीच खळबळ उडवून दिली. नगरपालिकेला कारभार नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांचे पती मंगल पिंपळशेंडे व स्वीकृत सदस्य राजू महाजन हेच चालवित असल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. कुणाला किती कमिशन दिल्या जाते व नगरपालिकेमध्ये होत असलेल्या भोंगळ कारभाराबद्दलही त्यांनी पत्रकार परिषदेत काही पुरावेही सादर केले.
२०१६-१७ चे विद्युत विभागाचे कंत्राट अमोल सोनेकर यांना मिळाले. एक कंत्राट परस्पर रद्द करण्यात येऊन दुसऱ्या कंत्राटाबाबत तडजोड करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या सहीनिशी पत्र ही देण्यात आले. तडजोड करण्याकरीता १३ एप्रिलला गेलो असता, मुख्याधिकारी अनुपस्थित होते. विद्युत विभागाचे वाकुलकर यांना विचारणा केली असता साहेब नसल्याने तडजोडीचे पूर्ण हक्क नगराध्यक्षांना दिल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही नगराध्यक्षांना भेटा असा सल्लाही त्यांनी दिला. पत्र देवून मुख्याधिकारी तडजोडसाठी आयोजित बैठकीला जाणूनबुजून ते गैरहजर असल्याचा आरोपही अमोल सोनेकर यांनी केला आहे.
तडजोड करण्याकरिता नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांच्या दालनात गेलो असता त्याठिकाणी नगराध्यक्षांचे पती मंगल पिंपळशेंडे, स्वीकृत सदस्य राजू महाजन, नगरसेवक पुरुषोत्तम खिरटकर व इतर नगरसेवक तिथे बसले होते. नगराध्यक्षांनी मला त्यांच्या समोर तडजोड करायला लावली. तुम्ही जुन्याच दराप्रमाणे काम करा अन्यथा हे काम दुसऱ्या कंत्राटदाराला देण्यात येईल, असे नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांनी मला बजावून सांगितले, असे सोनेकर म्हणाले. तुम्ही सहीनिशी तसे लिहून द्या मी काम करायला तयार आहे असे म्हणताच मागे बसलेले नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांचे पती मंगल पिंपळशेंडे चिडले. तुझ्या दबावासाठी नगराध्यक्ष बनविले का, असा सवाल त्यांनी उपस्थित करून नगराध्यक्ष पत्नीला कंत्राट रद्द करण्याचे फर्मान सोडले. तसे पत्र तयार करण्याबाबतही त्यांनी जनाबाईला सांगितले. त्यांच्याच सुरात सूर मिसळून नगरसेवक पुरुषोत्तम खिरटकर, स्वीकृत सदस्य राजेश महाजन यांनीही निवेदा रद्द करण्याबाबत सांगितले. जुन्या दरा प्रमाणे काम करण्यास तयार असतानाही निविदा रद्द करण्याची धमकी दिल्याने मी तडजोड करायला तयार आहे, असे सांगितले. तडजोडीचे सर्व अधिकार हे मुख्याधिकारी यांचेकडे असतात. मी त्यांच्याशी बोलतो असे म्हणताच मुख्याधिकाऱ्यांनी तुम्हीच तडजोड करा, असे सांगितल्याचे जनाबाई पिंपळशेंडे यांनी सांगितले, अशी माहिती अमोल सोनेकर यांनी पत्रकारांना दिली.

अब्रु नुकसानीचा दावा करणार-राजू महाजन
कामाचे कंत्राट न मिळाल्याने बदला घेण्यासाठी अमोल सोनेकर यांनी नगराध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांचा विनयभंग केला. त्यांच्या पतीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हेही दाखल झालेत. त्यामुळे सोनेकर यांचे मानसिक संतुलन बिघडले असून ते बिनबुडाचे आरोप करीत आहेत. जनाबाई पिंपळशेंडे यांच्याशी असलेल्या वादात मला गोवण्यात येत असल्याने मी सोनेकर यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे, असे स्वीकृत सदस्य राजू महाजन यांनी सांगितले.

Web Title: The governor of the municipality runs the head of the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.