एका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर शासकीय ग्रामीण रुग्णालयाचा भार
By Admin | Updated: September 8, 2014 01:10 IST2014-09-08T01:10:50+5:302014-09-08T01:10:50+5:30
सिंदेवाही येथील तालुकास्थळी असलेले शासकीय ग्रामीण रुग्णालय सध्या आजारी पडले आहे. एकच वैद्यकीय अधिकारी ...

एका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर शासकीय ग्रामीण रुग्णालयाचा भार
सिंदेवाही : सिंदेवाही येथील तालुकास्थळी असलेले शासकीय ग्रामीण रुग्णालय सध्या आजारी पडले आहे. एकच वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने याचा रुग्णांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात तातडीने रिक्त पदे भरावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
तालुक्यातील लोकसंख्या एक लाख ३० हजार आहे तर सिंदेवाही नगराची लोकसंख्या २५ हजाराच्या वर आहे. तालुक्यात ११५ गावे असून ५५ ग्रामपंचायती आहेत. तालुक्यात नवरगाव, वासेरा, मोहाळी, गुंजेवाही येथे जिल्हा परिषदेचे चार प्राथमिक स्वास्थ केंद्र आहेत. २० आरोग्य उपकेंद्र आहेत. परंतु शासकीय ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने तालुक्यातील वैद्यकीय सेवा कोलमडली आहे. सिंदेवाही हे तालुक्याचे ठिकाण असून चंद्रपूर- नागपूर तसेच चिमूर ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर आहे. या रुग्णालयात खेड्यातील रुग्ण उपचाराकरिता सिंदेवाहीला येतात. ३० खाटांची व्यवस्था असलेल्या या रुग्णालयात मागील १५ वर्षापासून स्थायी वैद्यकीय अधीक्षक नाही. येथील रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची चार पदे मंजूर आहेत. त्यातील एक वैद्यकीय अधिकारी डॉ. आकनुरवार यांना डेप्युटेशनवर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. तर दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोशन फुलझेले हे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळीत आहेत. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी एक पद, वैद्यकीय अधिकारी (एनसीडी) एक पद, वैद्यकीय अधिकारी दोन मिळून चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहेत.
याशिवाय औषधी निर्माता एक पद, सिस्टर दोन पदे रिक्त आहेत. सध्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खांद्यावर ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा उभा आहे. त्यामुळे वैद्यकीय आरोग्य सेवा कोलडमली आहे. येथील रुग्णालयात दररोज ओपीडीमध्ये २५० रुग्णांची नोंद होत आहे. त्यामध्ये ताप, कावीळ, डेंग्यु, डायरिया, विषमज्वर या साथीच्या रोगाचा समावेश आहे. डॉ. फुलझेले यांना ओपीडी सांभाळणे, पोलीस विभागातील आरोपीची वैद्यकीय तपासणी, प्रसुती, रुग्ण तपासणी, आपतकालीन तपासणी, शवविच्छेदन, मेडीकल एमएलसी करणे अशा विविध कामामुळे त्यांच्यावर ताण पडत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त असतांना येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर चंद्रपूरला पाठविणे या जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निर्णयाबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परिणामी एकट्या वैद्यकीय अधिकाऱ्याची संबंधित रुग्णावर उपचार करताना तारांबळ उडत आहे. पाहिजे त्या प्रमाणात रुग्णांना औषधी मिळत नसल्याने अनेक रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या रुग्णालयात सोनोग्राफी व डेंग्यु तपासणीकरिता सीबीसी मशीन नाही. तसेच सिकलसेलचे परिक्षण करण्याकरिता इलेक्ट्रोप्रोसेसची व्यवस्था नाही. येथील वन डेपोजवळ पोस्टमार्टम केंद्राची इमारत आहे. सदर इमारत जीर्ण झाली असून आवश्यक ते साहित्य या केंद्रात उपलब्ध नाही. या रुग्णालयात आवश्यक पाहिजे तेवढे. शौचालय व प्रसाधानगृह नाहीत. गंभीर रुग्णांना रेफर टू चंद्रपूर पाठविण्यात येते. नवीन वैद्यकीय अधिकारी सदर रुग्णालयात रुजू होण्यास नकार देत असल्याची माहिती अधिकृतरित्या समजली. (तालुका प्रतिनिधी)