सुभाष भटवलकर
विसापूर : शासनाने कोरोनाच्या काळात नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत धान्य वितरण केले. गरजेपेक्षा जास्त हे धान्य मिळत असल्यामुळे गरिबांचे हे धान्य थेट काळ्या बाजारात राजरोसपणे शिरण्याचा प्रकार गावखेड्यात पाहायला मिळत आहे. काही अज्ञात युवकांकडून रेशन धान्याची घरोघरी जाऊन खरेदी करण्यात येत आहे.
दहा रुपये किलो दराने तांदूळ, तर ११ रुपये किलो दराने गहू हे युवक नागरिकांकडून खरेदी करतात व हॉटेल व्यावसायिक, इडली-डोसा टपरीचालक यांना चढ्या १८ ते २० रुपये दराने विकतात. तसेच काही तांदूळ थेट तेलंगणातील व्यापारी खरेदी करून, त्याला घासाई करून पातळ बनवितात व एचएमटी किंवा श्रीराम या नावाने विकायला पाठवून ग्राहकांची फसगत करत आहेत, अशी माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. त्यामुळे शासनाने या काळ्याबाजाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोट
गावात काही युवक घरोघरी जाऊन धान्य खरेदी करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. याबाबत तहसीलदार व तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
- अनेकश्वर मेश्राम
उपसरपंच, ग्रामपंचायत, विसापूर.