गोसीखुर्दचे काम ३२ वर्षांनंतरही अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST2021-01-08T05:36:04+5:302021-01-08T05:36:04+5:30

नागभीड : ३२ वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या गोसेखुर्द या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाच्या धरणाचे काम झाले असले तरी या प्रकल्पाच्या ...

Gosikhurd's work is still incomplete after 32 years | गोसीखुर्दचे काम ३२ वर्षांनंतरही अपूर्ण

गोसीखुर्दचे काम ३२ वर्षांनंतरही अपूर्ण

नागभीड : ३२ वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या गोसेखुर्द या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाच्या धरणाचे काम झाले असले तरी या प्रकल्पाच्या कालव्यांचे आणि वितरिकांचे काम अपूर्णच आहे. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुके सिंचनापासून वंचितच आहेत.

आता मुख्यमंत्रीच या कामाची पाहणी करण्यासाठी नागभीड तालुक्यात येत असल्याने उर्वरित काम जलदगतीने पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तत्कालीन खासदार विलास मुत्तेमवार यांच्या प्रयत्नाने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी २२ एप्रिल १९८८ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. भूमिपूजनानंतरच्या या ३० वर्षांत मुख्य प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण अशा ४२ कि.मी. लांबीच्या डाव्या आणि ११० कि.मी. लांबीच्या उजव्या कालव्यांचे काम पूर्ण करण्यात आले. दरम्यान, या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यताही देण्यात आली. पण, प्रकल्पाला गती येण्याऐवजी दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. या कालव्यांचे उपकालवे आणि पाणी वितरिकांच्या कामाला अद्याप सुरुवातच करण्यात न आल्याने या प्रकल्पाचे शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास आणखी किती दिवस लागतात, याचा कोणताच पत्ता नाही.

धरणाचे आणि उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाल्याने तीन वर्षांपूर्वी उजव्या कालव्याच्या माध्यमातून धरणाचे पाणी आसोला मेंढा तलावात सोडण्यात आले. आसोला मेंढा तलावाच्या ज्या काही जुन्या वितरिका आहेत, त्याद्वारे सावली तालुक्यात सिंचन उपलब्ध होत असले तरी चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य तालुके मात्र सिंचनापासून गेल्या ३० वर्षांत वंचितच आहेत, हेही एक वास्तवच आहे. या प्रकल्पात समावेश असलेल्या नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, चिमूर या व अन्य तालुक्यांत भाताची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. नव्हे याच पिकावर या तालुक्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. गोसेखुर्द धरणाच्या निमित्ताने या तालुक्यांना मोठी आशा निर्माण झाली होती. पण, शासन या प्रकल्पाबाबत जे चालढकल धोरण अवलंबत आहे, त्यावरून या तालुक्यांच्या आशा पार मावळून गेल्या आहेत.

उजव्या कालव्याचा उपकालवा असलेला घोडाझरी या उपकालव्याची अवस्था फार बिकट आहे.

बॉक्स

उपकालव्याचे कामही रखडले

दहा-बारा वर्षांपूर्वी या उपकालव्याचे काम सुरू करण्यात आले. काही वर्ष या उपकाल्याचे काम जोरात करण्यात आले. मात्र, नंतर बांधकाम कंपन्यांची देयके थकत गेल्याने या कंपन्यांनी कामच करणे बंद केले. नंतर तर या कंपन्यांची कंत्राटे रद्द करण्यात आली. तेव्हापासून या उपकालव्याच्या कामाला जी खीळ बसली, ती खीळ अद्यापही कायम आहे. आता या उपकालव्याचे जे काम झाले आहे ते पूर्णतः खंड खंड स्वरूपात असून, या उपकालव्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

बाॅक्स

मातीचे डोंगर व मृत्यूचे घाट

या उपकालव्यातून मोठ्या प्रमाणावर मातीचा उपसा करण्यात आला आहे. या मातीची इतरत्र विल्हेवाट न लावता कालव्यानजीकच्या शेतकऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून तिथेच ठेवण्यात आली. या मातीचे मोठे-मोठे डोंगर तयार झाली आहेत. परिणामी शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. एवढेच नाही, तर या उपकालव्यात आजपर्यंत अनेकांचा बळीही गेला आहे. नागभीड तालुक्यापुरते बोलावयाचे झाल्यास या चार पाच वर्षांत सात लोकांचा बळी या उपकालव्याने घेतला आहे.

Web Title: Gosikhurd's work is still incomplete after 32 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.