गोंडपिपरी नगरपंचायत निवडणूक : एकाच प्रभागात सख्या जावांमध्ये टक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 18:34 IST2022-01-10T18:15:54+5:302022-01-10T18:34:30+5:30
गोंडपिपरीतील प्रभाग क्रमांक १५ या महिला सर्वसाधारण गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलीमा दामोदर गरपल्लीवार तर अपक्ष उमेदवार शारदा खेमदेव गरपल्लीवार उभ्या आहेत.

गोंडपिपरी नगरपंचायत निवडणूक : एकाच प्रभागात सख्या जावांमध्ये टक्कर
चंद्रपूर : गाव-खेड्यांतील निवडणुकांची रंगतच काही वेगळी असते. त्यातल्या त्यात जर एकाच कुटुंबातील व्यक्ती आमने-सामने लढत असतील तर मग सांगायलाच नको. सर्वसाधारण महिला गटात मोडणाऱ्या गोंडपिपरीतील प्रभाग क्रमांक १५ मध्ये सख्या जावा आमनेसामने असून यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. यामुळे ओबीसी आरक्षण होते तिथे सर्वसाधारण गटातून निवडणुका होताहेत. गोंडपिपरी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या १८ जानेवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीत तीन प्रभागातील २ जागा सर्वसाधारण महिलांसाठी तर १ जागा पुरुष प्रवर्गाकरता आहे. येथील प्रभाग क्रमांक १५ मध्ये सख्या जावा एकमेकांना टक्कर देत आहेत.
गोंडपिपरीतील प्रभाग क्रमांक १५ या महिला सर्वसाधारण गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलीमा दामोदर गरपल्लीवार तर अपक्ष उमेदवार शारदा खेमदेव गरपल्लीवार उभ्या आहेत. या दोघी सख्या जावा असल्याने त्यांच्यातील लढतीमुळे राजकीय वातावरणात रंगत आल्याचे चित्र आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किसनराव गरपल्लीवार हे पंचायत समीतीचे सभापती होते. त्यांचे दोन्ही चिरंजीव हे सध्या राजकारणात सक्रिय आहेत. दामोदर गरपल्लीवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आहेत. तर, खेमचंद गरपल्लीवार हे अपक्षाच्या भुमिकेत आहेत. त्यांनी आपल्या पत्नीला काँग्रेसची तिकीट मिळावी यासाठी भरपूर प्रयत्न केले मात्र, ते होऊ शकले नाही. यानंतर त्यांनी समाज माध्यमातून भाजपच्या कमळाचे सिम्बॉल टाकत शुभेच्छासंदेश देत भाजपशी जुळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही त्यांना अपयश आहे. शेवटी त्यांनी पत्नीला अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले.
याच प्रभागातून काँग्रेसचे रामचंद्र कुरवटकर यांच्या पत्नी सुनीता कुरवटकर, भाजपकडून शुभांगी मनोज वनकर तर सेनेकडून सोनाली सुरेंद्र मांदांडे या उभ्या आहेत. मात्र, एकाच प्रभागात सख्या जावा आमनेसामने असल्याने रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे.
मैदानात आणखी कोण-कोण
गोंडपिपरी नगरपंचायत निवडणुकीच्या मैदानात यावेळी मोठया प्रमाणावर व्यापारी आपले नशीब अजमावीत आहेत. एच पी गॅसच्या संचालिका सविता महेंद्रसिंह चंदेल या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रभाग ६ मध्ये उभ्या आहेत. सचिन चिंतावार हे किराणा दुकानदार आहेत. यावेळी कॉंग्रेसच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक ११ मधून उभे आहेत. साई मशीनरिचे संचालक अजय माडूरवार यांच्या पत्नी सारिका माडूरवार प्रभाग क्र. ६ मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याच प्रभागातून भाजयुमोचे कार्यकर्ते तथा स्टील भंडार दुकानदार स्वप्निल माडूरवार याच्या पत्नी प्रांजली बोनगिरवार यासुद्धा रिंगणात आहेत.