गोलाभूज मुरमाडी रस्ता उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:22 IST2021-05-29T04:22:05+5:302021-05-29T04:22:05+5:30
राजोली : मूल तालुक्यातील टोकाच्या, दुर्गम व आदिवासीबहुल जंगलव्याप्त गावांना जोडणाऱ्या गोलाभूज-मुरमाडी या रस्त्याची दयनीय अवस्था आहे. कंत्राटदाराने रस्ता ...

गोलाभूज मुरमाडी रस्ता उखडला
राजोली : मूल तालुक्यातील टोकाच्या, दुर्गम व आदिवासीबहुल जंगलव्याप्त गावांना जोडणाऱ्या गोलाभूज-मुरमाडी या रस्त्याची दयनीय अवस्था आहे. कंत्राटदाराने रस्ता मजबुतीकरण करण्याकरिता दोन्ही बाजूंना गेल्या अनेक महिन्यांपासून खोदकाम करून ठेवले आहे. शिवाय रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडले असल्याने ग्रामस्थांना चालताना त्रास सहन करावा लागत आहे.
हा रस्ता जंगलव्याप्त असून येथे हिंस्र पशूंचा मुक्तसंचार आहे. शिवाय ग्रामस्थांच्या वहिवाटीचा मुख्य मार्ग असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. परंतु बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कंत्राटदारांच्या मर्जीनुसार काम सुरू असून, अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या दोन्ही बाजू अर्धवट खोदून ठेवल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अपघाताची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कोट
गेल्या आठ महिन्यांपूर्वी कंत्राटदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खोदकाम करून काम बंद केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम त्वरित पूर्ण करावे.
- नीलदेव भुरसे
माजी उपसरपंच, मुरमाडी