वन्यजीवांच्या शिकारीऐवजी पिण्यास पाणी द्या - प्रकाश कामडे

By Admin | Updated: May 19, 2016 00:49 IST2016-05-19T00:49:00+5:302016-05-19T00:49:00+5:30

उन्हाळ्यात उष्णतेमुळे वाढणारी दाहकता, सर्वत्र भासणारी पाण्याची कमतरता नवीन नाही. उन्हाळ्यात नदी, नाले, तलाव, जंगलातील नैसर्गिक स्रोत सर्वच कोरडे पडतात.

Give water to drink rather than wild animals - Light works | वन्यजीवांच्या शिकारीऐवजी पिण्यास पाणी द्या - प्रकाश कामडे

वन्यजीवांच्या शिकारीऐवजी पिण्यास पाणी द्या - प्रकाश कामडे

चंद्रपूर : उन्हाळ्यात उष्णतेमुळे वाढणारी दाहकता, सर्वत्र भासणारी पाण्याची कमतरता नवीन नाही. उन्हाळ्यात नदी, नाले, तलाव, जंगलातील नैसर्गिक स्रोत सर्वच कोरडे पडतात. तेव्हा वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. याचाच परिणाम म्हणून कधी कधी प्राणी उष्माघाताने मृत्युमुखीसुद्धा पडतात. काही वन्यजीव हे गावातील तलाव आणि नद्या यामध्ये आपली तहान भागविण्यासाठी येतात. परंतु गावकरी व शिकारी याचा फायदा घेत शिकार करतात. पाणी पिण्यासाठी वन्यजीवांची शिकार करून पाप करण्यापेक्षा त्यांना पिण्यास पाणी देऊन पुण्य कमवा, असा मौलिक सल्ला सार्डचे अध्यक्ष प्रकाश कामडे यांनी भामडेळीवासीयांना दिला.
ते भामडेळी येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील भामडेळी येथील इको फ्रेन्डली स्कूल म्हणून नावारूपास आलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भामडेळी येथे सोमवारी सार्ड संस्थेच्या वतीने पक्ष्यांसाठी फुडर व पाणीपात्र लावण्यात आले. साध्य संस्था पुणे, यांच्या या कार्यक्रमात साध्य संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना कपडे, जोडे, सॉक्स, पेन-बुक, बॅग, खेळण्याचे साहित्य, टिफीन बॉक्स, वॉटर बॅग आदी साहित्य वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना मार्कंडेवार आणि शिक्षक विजय खनके यांनी शाळेतील विद्यार्थ्यांकडून अनेक प्रकारचे विज्ञान प्रयोग, समूह नृत्य, एकांकिका यांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. सार्ड संस्थेच्या वतीने विजय खनके व मुख्याध्यापिका वंदना खनके यांच्या कामाचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपने होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश कामडे, सरपंच संतोष जमदाडे, साध्य संस्था पुणेचे अध्यक्ष सौरभ गुप्ता, भाविक येरगुडे, राकेश म्हस्के उपस्थित होते. संचालन विजय खनके यांनी तर आभार वंदना मार्कंडेवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी पारूल गुप्ता, सुजीत गोयल तसेच भामडेळीवासीयांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Give water to drink rather than wild animals - Light works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.