घुग्घुसला अखेर नगर परिषदेचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:20 IST2021-01-01T04:20:24+5:302021-01-01T04:20:24+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतीला नववर्षाच्या पूर्वसंध्येला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाला आहे. ...

घुग्घुसला अखेर नगर परिषदेचा दर्जा
चंद्रपूर : जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतीला नववर्षाच्या पूर्वसंध्येला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाला आहे. याबाबतचा अध्यादेश राज्याच्या नगर विकास विभागाने गुरुवारी काढून यावर शिक्कामोर्तब केले आहे. मागणी पूर्ण झाल्याने घुग्घुसवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
घुग्घुसला नगर परिषदेचा दर्जा मिळावा म्हणून १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्कार टाकला होता. ही मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने विजय वडेट्टीवार यांनी घुग्घुसवासीयांच्या वतीने शासनदरबारी रेटून धरली. अखेर राज्य शासनाने घुग्घुसवासीयांच्या भावनेचा आदर राखत नववर्षाची भेट दिली.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच पालकमंत्री वड्डेटीवार यांनी एका पत्रकार परिषदेत घुग्घुस नगर परिषदेला हिरवी झेंडी दाखविली होती. यानंतर लगेच ३१ ऑगस्ट २०२० रोजी घुग्घुस नगर परिषदेची प्रथम अधिसूचना शासकीय स्तरावर जाहीर करण्यात आली. अशातच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या. यामध्ये घुग्घुस ग्रामपंचायतीचीही निवडणूक जाहीर झाली. मात्र घुग्घुस येथील सर्वच राजकीय पक्षांनी हातात हात घालून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यासोबतच विविध प्रकारच्या आंदोलनाची मालिकाच सुरू केली. हे आंदोलन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत सुरूच होते. घुग्घुस येथून ग्रामपंचायतीसाठी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही. या बाबीला २४ तास उलटत नाही तोच राज्य शासनाने घुग्घुसला नगर परिषदेचा दर्जा बहाल केला. इतकेच नव्हे, तर नगर विभागाने याबाबतचा अध्यादेशही काढला.
जिल्ह्यात आता १० नगर परिषदा
चंद्रपूर जिल्ह्यात घुग्घुसच्या रूपाने नव्या नगर परिषदेची भर पडली आहे. जिल्ह्यात बल्लारपूर, राजुरा, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल या नऊ नगर परिषदा अस्तित्वात आहे. घुग्घुसची भर पडल्याने जिल्ह्यात आता नगर परिषदांची संख्या १० झाली आहे. यासह सहा नगर पंचायतीही आहेत. चंद्रपूरला महानगरपालिकेचा दर्जा आधीच मिळाला आहे.
कोट
घुग्घुस येथे नगर परिषद स्थापन करण्यात यावी, अशी मागणी त्या परिसरातील हजारो नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करीत होते. परंतु याकडे एकाही राजकीय नेत्याने लक्ष दिले नाही. ही बाब घुग्घुस येथील काँग्रेसचे राजू रेड्डी व कार्यकर्त्यांनी लक्षात आणून देताच स्वतः नगर परिषद स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला. या प्रयत्नाला यश आले आहे. अखेर घुग्घुस येथे नगर परिषदेची स्थापना करण्यात आली असून त्यासंदर्भात आज अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ही घुग्घुसवासीयांना नवीन वर्षाची भेट आहे.
- विजय वडेट्टीवार, पालकमंत्री, चंद्रपूर.