घुग्घुसमध्ये ‘गँग आॅफ क्वॉर्टर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 00:31 IST2016-08-01T00:31:25+5:302016-08-01T00:31:25+5:30
वेकोलि वणी क्षेत्राच्या घुग्घुस कामगार वसाहतीत अनेक क्वार्टर कामगारांना न देता बाहेरील लोकांना देण्याचा गोरखधंदा सुरू आहे.

घुग्घुसमध्ये ‘गँग आॅफ क्वॉर्टर’
वेकोलिच्या व्यवस्थापनाचे मौन : कामगारविरोधी धोरण
घुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्राच्या घुग्घुस कामगार वसाहतीत अनेक क्वार्टर कामगारांना न देता बाहेरील लोकांना देण्याचा गोरखधंदा सुरू आहे. कामगारांना क्वॉर्टर मिळाले नाही की, ते रिकाम्या क्वॉर्टरमध्ये अतिक्रमण करीत असल्याने एकीकडे वेकोलि प्रशासन या आपल्याच कामगारांवर कारवाईचा बडगा उगारत आहे. तर दुसऱ्या लोकांनी केलेल्या अवैध कब्जाविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही.
वणी क्षेत्रातील घुग्घुस, नायगाव, निलजा खाणीच्या कामगारांकरिता विविध कामगार वसाहती आहेत. त्या क्वार्टरमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरील क्षेत्राच्या लोकांनी अवैध ताबा घेतला आहे. या परिसरातील कामगारांना बराच आटापिटा करून क्वार्टर मिळत नसल्याने खाली क्वार्टरमध्ये अवैध कब्जा करून वास्तव्य करीत आहे. या कामगारांवर चौकशी समिती बसवून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. परंतु वेकोलि कामगार नसलेल्या व पाच-सहा वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अनेकांचा मोठ्या प्रमाणात अवैध कब्जा आहे. त्याबाबत व्यवस्थापन कोणतीही कारवाई करीत नाही बंद नकोडा कोळसा खाण क्षेत्रात कामगार वसाहत आहे. त्या कामगार वसाहतीत अधिकांश बाहेरील क्षेत्राच्या लोकांचा अवैध कब्जा आहे. वेकोलिला वीज पाण्याची सोय वेकोलिची आहे आणि महिन्याकाठी २५ लाख रुपये द्यावे लागत आहे मात्र त्या कामगार वसाहतीमधील अवैध लोकांवर कारवाई न करता घुग्घुस येथील कामगार वसाहतीत वास्तव्यास असलेल्या सुमारे ४५ कामगारांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा प्रयत्न करीत आहे. वेकोलिच्या कामगारविरोधी धोरणाचा कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. घुग्घुस क्षेत्रात २५०० क्वार्टर आहेत. त्या क्वार्टरचे नियोजन योग्य केल्यास क्वार्टरचा लाभ न मिळालेल्या कामगारांना क्वार्टर दिल्यानंतरही क्वार्टर शिल्लक राहतील असे कामगाराकडून कळते. कामगार वसाहतीमध्ये असलेले क्वार्टर या क्षेत्रातील विविध खाण कामगारांना निर्धारित कोटा आहे. त्याप्रमाणे कामगारांना क्वार्टर देण्याची पद्धती आहे. बऱ्याच कामगारांना नियमानुसार क्वार्टर मिळत नसल्याने नाईलाजास्तव खाली असलेल्या क्वार्टरवर अवैध्य कब्जा करून आपला हक्क मिळवून वास्तव्य करीत आहेत. अशा अवैध कब्जा करणाऱ्या कामगारांवर कारवाई करण्यात येते कामगारांच्या क्वार्टरला लागून अनेकांचे अतिक्रमण आहे. त्याच्या विरोधात व्यवस्थापन कारवा का करीत नाही, असा प्रश्न कामगार उपस्थित करीत आहेत. विशेष: सदर प्रकरणी या क्षेत्रातील कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मौन धारण करण्याबाबत तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
बाहेरच्या लोकांना अवैध सुविधा
वितरण करण्याकरिता क्वार्टर अलाटमेंट कमिटी आहे. त्या कमिटीत वेकोलिचे अधिकारी व सर्व ट्रेड युनियन तथा अन्य संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्या कमिटीच्या माध्यमातून वरिष्ठतेनुसार कामगारांना क्वार्टर देण्याचा निकष आहे. कामगारांना प्रथम वरच्या मजल्यावरील क्वार्टर दिले जाते. काही अवधीनंतर खालचे क्वार्टर देण्याचा निकष आहे. मात्र या ठिकाणी खालच्या क्वार्टरवरही बाहेरील लोकांचा अवैध कब्जा आहे. ज्या सुविधा कामगारांना नाहीत त्या बाहेरील लोकांना देण्यात आल्या आहे.
कामगारांच्या क्वार्टरची स्थिती गंभीर
घुग्घुस येथे असलेल्या कामगार वसाहतीतील क्वार्टरची दुरवस्था झाली आहे. व्यवस्थापनाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष चालविले आहे. त्यामुळे कामगारांचे जीवन धोक्यात आले आहे. केव्हाही दुर्घटना होऊ शकते अशी स्थिती असल्याने व नाल्या गटार आणि ठिकठिकाणी कचराचे ढेर पडले असल्याने आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. कामगार आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याविषयी चिंतेत असले तरी व्यवस्थापन आणि कामगार संघटना बघ्याची भूमिका का घेत आहे. याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे.