मनपाच्या आवाहनाला गणेश मंडळांचा ठेंगा
By Admin | Updated: August 31, 2014 23:41 IST2014-08-31T23:41:50+5:302014-08-31T23:41:50+5:30
सार्वजनिक सण, उत्सव, कार्यक्रमांसाठी मंडप उभारताना मनपाची परवानगी घेऊनच मंडप उभारण्याचे आवाहन, मनपा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी केले होते. मात्र, या आवाहनाला सार्वजनिक गणेश मंडळांनी ठेंगा

मनपाच्या आवाहनाला गणेश मंडळांचा ठेंगा
मंगेश भांडेकर - चंद्रपूर
सार्वजनिक सण, उत्सव, कार्यक्रमांसाठी मंडप उभारताना मनपाची परवानगी घेऊनच मंडप उभारण्याचे आवाहन, मनपा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी केले होते. मात्र, या आवाहनाला सार्वजनिक गणेश मंडळांनी ठेंगा दाखविला आहे. शहरातील केवळ ४० मंडळानीच परवानगी घेऊन मंडप उभारले असून उर्वरित मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी मात्र परवानगीविनाच रस्त्यावर मंडप उभारले आहे.
सार्वजनिक उत्सव, समारंभ, सभा आदी कार्यक्रमांसाठी रस्त्यांवर मंडप उभारताना, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते. अनेक ठिकाणी रस्ता खोदून खांब किंवा लाकडी बल्ल्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर खड्डे पडतात. कार्यक्रम आटोपल्यानंतर पडलेला खड्डा बुजविला जात नाही. त्यामुळे रस्त्यावर तो खड्डे वाढत जाऊन अपघात घडण्यास कारणीभूत ठरतोे. याची दखल घेत मनपा प्रशासनाने गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर आवाहन करून मंडप उभारण्यासाठी मनपाची परवानगी आवश्यक असल्याचे सुचित केले. परवानगी न घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. मात्र, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी याला ठेंंगा दाखविला आहे. मनपाच्या परवानगीसाठी प्रभाग कार्यालयात अर्ज करून ५०० रूपये शुल्क मनपाच्या कर विभागात भरावे लागते. त्यानंतर मंडळाच्या सदस्यांकडून मंडप उभारताना रस्त्याची किंवा सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही, असे हमीपत्र लिहून दिले जाते. त्यानंतर मंडळाला परवानगी दिली जाते. यात एखाद्या बादलीत रेती भरुन रस्त्यावर खड्डे न पाडता, बल्या उभे करण्याचा मनपाचा नियम आहे. मात्र, मनपाच्या या आवाहनाला सार्वजनिक गणेश मंडळांनी ठेंगा दाखवून रस्त्यावरच मंडप उभारले आहे. शहरातील गणेश मंडळांच्या मंडपाची पाहणी केली असता, अनेकांनी रस्त्याच्या कडेला खड्डे खोदून बल्या उभे केले आहेत. तर मुख्य मंडपही अशाच प्रकारे उभा आहे. शहरात तीनशेच्या जवळपास सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. मात्र, यापैकी केवळ आजपर्यंत ४० मंडळानी मनपाच्या कर विभागात ५०० रुपये शुल्क भरुन परवानगी घेतली आहे. उर्वरित मंडळाच्या सदस्यांनी मात्र, मनपाची कोणतीही परवानगी न घेता मंडप उभारले आहे. सार्वनिक कार्यक्रमाला मनपा प्रशासन कोणताही अडथळा आणणार नाही, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या मंडळानी परवानगी घेतली आहे, त्या मंडळांनी मनपाच्या नियमाप्रमाणे मंडप उभारले किंवा नाही, याची चौकशी करण्याचे काम प्रभागाच्या अभियंत्याकडे आहे. दोषी आढळणाऱ्या मंडळांवर काय कारवाई करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.