गावांगावांतील गांधी चौक स्वातंत्र्य संग्रामाची ओळख
By Admin | Updated: August 15, 2016 00:26 IST2016-08-15T00:26:42+5:302016-08-15T00:26:42+5:30
गाव लहान असो वा मोठे, तेथे दोन चार चौक हे ठरलेलेच! आणि त्यात प्रत्येक गावांची समानता अशी की,...

गावांगावांतील गांधी चौक स्वातंत्र्य संग्रामाची ओळख
आठवणींना उजाळा : चौकात केल्या जायच्या चर्चा
वसंत खेडेकर बल्लारपूर
गाव लहान असो वा मोठे, तेथे दोन चार चौक हे ठरलेलेच! आणि त्यात प्रत्येक गावांची समानता अशी की, त्यातील एक ना एका चौकाला गांधी चौक असे नाव मिळालेले. आणि, प्रत्येक गावात गांधी चौकाला विशिष्ट ओळख आणि महत्त्वही.
‘दे दी हमे आजादी, बिना खडग बिना ढाल,
साबरमती के संत तुने कर दिया कमाल’
असे आपण महात्मा गांधी यांच्याबाबत ऐकतो आणि मनोमन तसे म्हणतही असतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक स्वातंत्र्यविरांचे मोलाचे सहकार्य व प्रसंगी त्यांचे बलीदानही आहे. स्वातंत्र्य संग्रामाला प्रेरणा मिळाली राणी झांशी, लोकमान्य टिळक, गोखले, महात्मा गांधी यांच्याकडून. महात्मा गांधी यांच्यामुळे या संग्रामाला अधिक धार मिळाली. अहिंसक क्रांतीचा विचार त्यांनी पेरला. आणि शहरापासून लहान खेड्यांपर्यंत संपूर्ण भारतात त्यांनी हा विचार नेला. स्वातंत्र्य प्रेमाची ज्योत त्यांनी मना मनात पेटविली. यामुळे, महात्मा गांधी यांचे नाव घराघरात पोहचले. गावचे मध्यवर्ती चार रस्ते एकत्र आलेले ठिकाण असते, ज्याला ‘पार’ किंवा ‘चावडी’ म्हणतात. गांधीजींच्या संदेशाची, देशात सुरू असलेल्या स्वातंत्र्य लढ्यांची चर्चा पारावर होऊ लागल्या. गांधीजींच्या नावाची जादू लोकांवर झाली. आणि, मग गांधीजींवरील प्रेम आणि श्रद्धेपोटी पाराच्या ठिकाणाला महात्मा गांधी यांचे नाव आपोआप पडू लागले आणि याातूनच, गावा गावात गांधी चौक झालेत. स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्य प्रेमाने झपाटलेल्या तरुणांनी गांधी चौकात एकत्रित व्हायचे. गांधीजी व इतर समकक्ष नेत्यांच्या स्फुर्तिदायी भाषणाची चर्चा त्यांच्यात व्हायची. आपणाला त्यात कोणती व कशी भूमिका करायची, याचा घाट चर्चेतून रचला जायचा. शिक्षीत तरुण, रेडीओ वा वर्तमानपत्रातून स्वातंत्र्य चळवळी विषयक येणाऱ्या ऐकलेल्या वाचलेल्या बातम्या गांधी चौकात इतरांना ऐकवायच्या !
स्वातंत्र्यपूर्व काळात, चंद्रपूरला आताच्या गांधी चौकात स्वातंत्र्य प्रेमाने झपाटलेल्या मारोती सांबाशिव कन्नमवार (स्व. मा.सां. कन्नमवार) या युवकाने, वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या स्वातंत्र्य लढ्याच्या ठळक बातम्या चौकातील फळ्यावर लिहून, स्वातंत्र्य चळवळीचा प्रचार सुरू केला होता. जेणेकरून लोकांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घ्यावा आणि झालेही तसेच! या उपक्रमातून प्रेरणा मिळून चंद्रपूरच्या युवकांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. असेच कार्य गावोगावी गांधी चौकांमध्ये युवकांनी या ना त्या माध्यमाने केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गावागावात, विशेषत: गांधी चौकात एकत्रित जमून ध्वज फडकावून, फटाक्यांचा वार उडवून आणि मिठाई वाटून लोकांनी आनंदोत्सव केला होता. गांधी चौकाला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही तेवढेच महत्त्व आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर, २६ जानेवारी, १५ आॅगस्ट या राष्ट्रीय दिनी इतर ठिकाणांसह प्रत्येक गावाच्या गांधी चौकात ध्वजारोहण करणे सुरू झाले. पुढे, गांधी चौकात ध्वज कुणाच्या हाताने फडकवायचा, त्यावर नेमका हक्क कुणाचा या वादावर तंटे होऊ लागले. मुद्याची गोष्ट गुद्यावर येऊन ध्वज फडकविताना गाव पातळीच्या नेत्यांमध्ये ध्वजाच्या खाली धक्काबुक्कीचे दुर्दैवी प्रकारही लोकांना बघायला मिळाले. बल्लारपुरातील गांधी चौकातील ध्वज शहर काँग्रेसच्या अध्यक्षाने फडकविण्याची प्रथा आहे. बरेच वर्षापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे दोन गट झाले. व्यापारी बल्लारपूर शहरात शहर काँग्रेसचे दोन वेगवेगळे अध्यक्ष झाले होते. त्यामुळे, वाद उफाळला, गांधी चौकातील ध्वज काँग्रेसच्या कोणत्या गटाचा अध्यक्ष फडकविणार! दोनही गटाचे अध्यक्ष त्याकरिता हिरीरीने एकमेकांपुढे सज्ज... त्यांचे त्यांचे समर्थक त्यांच्या मागे उभे! दोनही गट ध्वजारोहण प्रसंगी हमरी तुमरीवर यायचे...! शेवटी, पोलीस संरक्षणात गांधी चौकातील ध्वजारोहण पार पडे. हा असा दुर्दैवी आणि संतापजनक प्रकार बल्लारपूरवासीयांनी सतत तीन चार वर्षे बघितला. गावा-शहरातील गांधी चौकांना अशा गोड-कडू प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे.