गावराणी चिंचेचा गोडवा हरवतोय
By Admin | Updated: March 29, 2015 01:09 IST2015-03-29T01:09:28+5:302015-03-29T01:09:28+5:30
पूर्वी सर्वत्र दिसणारी गावराणी चिंचेची झाडे दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत. राज्यासह जिल्ह्यात प्रत्येकाच्या घरी उन्हाळ्यात जेवणात चिंचेचा वापर असतो.

गावराणी चिंचेचा गोडवा हरवतोय
चंद्रपूर : पूर्वी सर्वत्र दिसणारी गावराणी चिंचेची झाडे दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत. राज्यासह जिल्ह्यात प्रत्येकाच्या घरी उन्हाळ्यात जेवणात चिंचेचा वापर असतो. परंतु आधी सहज मिळणारी चिंच आता चढ्या भावाने विकत घ्यावी लागत आहे.
चिंचेचे फळ प्रत्येक दिवशी जेवणात विविध पदार्थांमध्ये उपयोगात आणले जाते. त्यामुळे या पिकाची मागणी सर्वत्र असते. दक्षिण भारतीय राज्यात चिंचेचा सर्वाधिक उपयोग केला जातो. दक्षिणेकडील राज्याच्या प्रभावामुळे पूवीर्पेक्षा महाराष्ट्रात चिंच या फळाला अधिक महत्त्व येवू लागले आहे. चटणी चाटमसाला, पाणीपुरी सारख्या आहारात याचा उपयोग वाढत आहे, असे असले तरी आज घडीला स्थानिक व्यापारी किंवा व्यवसायी या पिकाकडे दुर्लक्ष करत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे तोडणी पासून तर विक्रीला तयार करण्यापर्यंत खर्च अधिक लागतो. पण बाजारात पडक्या दरात विक्री करावी लागते.
दुर्लक्षितपणामुळे कोणताही व्यक्ती चिंचीचे झाड स्वत:हून जगवण्यास तयार नाही. नैसर्गिकरित्या झाडे जगली तर जगली अशी स्थिती निर्माण झाली आहे. चांगले उत्पन्न देत असलेल्या व आहारात आवश्यक असलेल्या चिंचेच्या झाडाकडे दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी चिंचेची झाडे कमी होत आहेत.
चिंचेच्या एका झाडापासून पाच ते १0 हजारांचे उत्पन्न मिळते. तरी देखील चिंचेच्या पिकाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. वास्तविक पाहता फळाला तोडण्याकरिता झाडावर कोणीही चढण्यास तयार होत नाही. त्याच बरोबर फळाला तोडल्यानंतर टरफल काढणे फोडून बिया काढणे हे कामे परवडण्यासारखे नसल्याने याकडे स्थानिक व्यापारी किंवा व्यवसाय करणारे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दशकापासून ग्रामीण भागात चिंच कवडीमोलात भावात विकली जात आहे. उत्पादन म्हणून चिंच लावायला कुणीही तयार नाही. पूर्वी रस्त्याच्या दुतर्फा सहज दिसणारी चिंचेची झाडे आज कमी झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातूनच चिंचेचा गोडवा कमी होत चालला आहे. याकडे लक्ष देत चिंचेची लागवड करण्याची गरज निर्माण झाली आहे.(नगर प्रतिनिधी)
मार्च महिन्यात चिंच पिकायला सुरुवात होते. याच काळात व्यवसायी खरेदी करतात. मात्र यंदा ऐन मार्चच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने झोडपल्याने चिंच पिकाला याचा मोठा फटका बसला.
चिंचेच्या झाडापासून चिंच मालकाला आर्थिक आधाराची आस होती. पण ती नाहीशी झाली आहे. झाडावर चढून चिंच तोडायला मजूर मिळत नाही. टरफल व बिया बाहेर काढण्याकरिता मजूर वर्ग खूप लागतो. यावर प्रत्येक कामाप्रमाणे मजुरी आणि चिंचोके बाहेर काढण्याकरिता ५ ते ७ रुपए किलो प्रमाणे मजुरी द्यावी लागते. पण या तुलनेत फायदा अत्यल्प होत असल्याने स्थानिक व्यापारी वर्ग चिंचेकडे दुर्लक्ष करतो.
पूर्वी पाणीपुरी व्यावसायिकांकडून चिंचेची मागणी सर्वाधिक होती. परंतु आता पाणीपुरी मसाला तयार मिळत असल्याने ताच्या सहाय्यानेच पाणी बनवून व्यवसाय करण्यावर विक्रेते भर देतात. त्यामुळेही मागणी कमी झाली आहे. राज्यात चिंचेचे बरेच पदार्थ दक्षिण भारतातून आयात होत असल्याचे दिसते.